
रत्नागिरीतील शाळकरी मुलांसाठी सिटी बस – सर्व्हिस बस थांबत नसल्याची तक्रार
ठाकरे शिवसेनेकडून एसटी प्रशासनाला निवेदन
रत्नागिरी : सकाळी शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना सिटीबस आणि सर्व्हिस बस न थांबवल्याने पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट आहे. या प्रकरणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे रत्नागिरी शहरप्रमुख प्रशांत शंकरराव साळुंखे यांनी पालक आणि विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत एसटी विभाग नियंत्रकांना लेखी निवेदन दिले आहे. यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख प्रसाद सावंत उपस्थित होते.
पालकांकडून प्राप्त झालेल्या या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर दिलेल्या निवेदनात श्री. साळुंखे यांनी म्हटले आहे की, रत्नागिरी शहरातील साळवी स्टॉप, शिवाजीनगर, सहकारनगर, आयटीआय आणि अभ्युदय नगर या बस स्टॉपवर सकाळी शाळेत जाण्यासाठी विद्यार्थी बसची वाट पाहत थांबतात; मात्र सिटीबस किंवा सर्व्हिस बस मुलांना बसमध्ये न घेताच पुढे निघून जात आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना वेळेवर शाळेत पोहोचणे शक्य होत नसल्याची तक्रार विद्यार्थ्यांनी केली आहे.
निवेदनात त्यांनी एसटी प्रशासनाला तात्काळ आदेश देण्याची मागणी केली आहे की, वरील सर्व बस स्टॉपवर थांबणाऱ्या विद्यार्थ्यांना बसमध्ये घेऊनच पुढे जावे. पुढे असे प्रकार घडल्यास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे त्यावेळीच संबंधित वाहन चालकांना समज दिली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
नाणीज प्रकरणानंतर रत्नागिरी जिल्ह्यात एसटी कर्मचाऱ्यांच्या विद्यार्थ्यांप्रती असणाऱ्या वर्तनावरून आधीच वाद सुरू आहे. त्यातच आता शहरातीलच विद्यार्थ्यांना बस न थांबवण्याचा प्रकार समोर आल्याने पालकांमध्ये नाराजी आहे.



