दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनावर झालेल्या पोलिसी कारवाईच्या निषेधार्थ रत्नागिरीत भव्य निषेध मोर्चा


रत्नागिरी : दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनावर झालेल्या पोलिसी कारवाईच्या निषेधार्थ आज (२३ जुलै) रत्नागिरी शहरात हजारो विद्यार्थी, नागरिक, विविध विद्यार्थी संघटना, सामाजिक संघटना आणि नोकरदार वर्ग रस्त्यावर उतरला. गगनभेदी घोषणा देत हा विराट निषेध मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला आणि सरकारच्या धोरणांविरोधात तीव्र संताप व्यक्त करण्यात आला.
दिल्लीतील जंतर-मंतर येथे शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर रात्रीच्या अंधारात पोलिसांकडून करण्यात आलेल्या कारवाईचा निषेध करण्यासाठी शिव-शाहू-फुले-आंबेडकर विचार मंचाच्या पुढाकाराने हा मोर्चा आयोजित करण्यात आला होता. विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळणाऱ्या धोरणांविरोधात आणि २३ विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांबाबत सरकारने उत्तर द्यावे, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.
सकाळी मारुती मंदिर येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून मोर्चाला सुरुवात झाली. त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून मोर्चा शहरातील प्रमुख मार्गाने जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचला. हजारोंच्या संख्येने सहभागी झालेल्या विद्यार्थी, युवक, नागरिक आणि विविध संघटनांच्या कार्यकर्त्यांनी सरकारविरोधी जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला.
आंदोलनकर्त्यांनी सरकारवर विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप करत लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्यांवर बळाचा वापर करणे ही हुकूमशाहीची प्रवृत्ती असल्याची टीका केली. विद्यार्थ्यांचा आवाज दडपण्याचा कोणताही प्रयत्न यशस्वी होणार नाही, असा इशाराही यावेळी देण्यात आला.
मोर्चात सर्व विद्यार्थी संघटना, विविध सामाजिक संघटना, नोकरदार वर्ग तसेच विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. पक्षभेद आणि मतभेद बाजूला ठेवून विद्यार्थ्यांच्या प्रश्नासाठी एकत्र येण्याचे आवाहनही करण्यात आले.दरम्यान, हा मोर्चा सुरू असताना शहरातील वाहतुकीवर काही काळासाठी विपरीत परिणाम झाला. मोर्च्यात नागरिक, विद्यार्थी हजारोंच्या संख्येने सहभागी झाल्यामुळे मुख्य रस्त्यावर वाहनांची मोठीच्या मोठी रांग लागली होती. सकाळी भरलेली शाळा सुटण्याची आणि दुपारची शाळा भरण्याची वेळेला हा मोर्चा निघाल्यामुळे अनेक स्कूल बस, व्हॅन, शालेय मुलांची वाहतूक करणाऱ्या रिक्षा, दुचाकीवरून सोडणारे पालक ट्रॅफिकमध्ये अडकून पडले होते. मुख्य रस्त्यावरील झालेल्या वाहतूक कोंडीमुळे पर्यायी मार्गाने शहरातील सन्मित्रनगर येथे वाहतूक सुरू होती; मात्र या रस्त्यावरही प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती; परिणामी एक रुग्णवाहिकेला या वाहतूक कोंडीतून मार्गक्रमण करणे कठीण झाले. 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button