
आंबोली घाटात टस्कर हत्तीमुळे शिवशाही बस अर्धा तास खोळंबली; चालकाच्या सतर्कतेने टळला अनर्थ
आंबोली : आंबोली-नांगरतास गडदूवाडी परिसरात रात्रीच्या वेळी एका टस्कर हत्तीने मुख्य रस्त्यावर येत शिवशाही बसचा मार्ग अडवल्याची घटना घडली. बसचालकाने प्रसंगावधान राखून वाहन सुरक्षित अंतरावर थांबवल्यामुळे संभाव्य दुर्घटना टळली आणि बसमधील प्रवाशांचा जीव भांड्यात पडला.
माहितीनुसार, रात्री सुमारे पावणेआठच्या सुमारास पुण्याकडे जाणारी शिवशाही बस आंबोलीजवळील नांगरतास गडदूवाडी परिसरातून जात होती. त्याचवेळी जंगलातून एक टस्कर हत्ती अचानक मुख्य रस्त्यावर आला आणि रस्त्याच्या मध्यभागी उभा राहिला. समोर हत्ती दिसताच बसमधील प्रवासी आणि कर्मचारी काही काळ घाबरून गेले.
मात्र, चालक महेश सावंत यांनी शांतपणे परिस्थितीचा सामना करत बस सुरक्षित अंतरावर थांबवली. काही वेळ रस्त्यावर थांबल्यानंतर हत्ती स्वतःहून जंगलाच्या दिशेने निघून गेला. त्यानंतर बसने पुन्हा पुण्याच्या दिशेने प्रवास सुरू केला.
या परिसरात टस्कर हत्तीचे वारंवार दर्शन होत असल्याने रात्रीच्या वेळी प्रवास करणाऱ्या वाहनचालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. संभाव्य अपघात टाळण्यासाठी वन विभागाने या हत्तीच्या हालचालींवर लक्ष ठेवून योग्य ती उपाययोजना करावी, अशी मागणी स्थानिक नागरिक आणि वाहनचालकांकडून करण्यात येत आहे.




