कोकणच्या विकासासाठी एकत्र या; प्रमोद जठार यांचे भास्कर जाधवांना भाजपमध्ये येण्याचे खुले निमंत्रण


चिपळूण : भाजपचे विधान परिषदेचे आमदार प्रमोद जठार यांनी ठाकरे शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांना भाजपमध्ये प्रवेश करण्याचे खुले निमंत्रण दिले. कोकणच्या सर्वांगीण विकासासाठी अनुभवी नेत्यांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

चिपळूण येथे स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त आयोजित वृक्षारोपण कार्यक्रमात प्रमोद जठार आणि भास्कर जाधव यांनी एकत्र सहभाग घेतला. कार्यक्रमानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना जठार म्हणाले की, भास्कर जाधव हे कोकणातील अनुभवी आणि ज्येष्ठ नेते असून त्यांच्या अनुभवाचा अधिक प्रभावीपणे उपयोग होणे आवश्यक आहे. त्यामुळे त्यांनी भाजपमध्ये येऊन विकासाच्या कामात सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.

या कार्यक्रमाला दक्षिण रत्नागिरी भाजप जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव, सहदेव बेटकर यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या CJP आंदोलनावरही जठार यांनी भाष्य केले. आंदोलनात काही देशविरोधी आणि विघातक प्रवृत्तीच्या व्यक्तींनी घुसखोरी केल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच NEET प्रश्नपत्रिका गैरव्यवहार प्रकरणातील दोषींवर केंद्र सरकार कठोर कारवाई करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

विरोधी पक्षांवर टीका करताना जठार म्हणाले की, प्रभावी नेतृत्वाच्या अभावामुळे विरोधकांना काँग्रेसवर अवलंबून राहावे लागत आहे. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या आंदोलनामुळे काँग्रेसलाच राजकीय फटका बसल्याचा दावाही त्यांनी केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button