
आंबा-काजू उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर २४ जुलैला विशेष आढावा बैठक
आमदार किरण सामंत यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली होणार चर्चा
राजापूर : राजापूर व लांजा तालुक्यातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी शुक्रवार, दि. २४ जुलै रोजी विशेष आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या बैठकीला राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार किरण सामंत प्रमुख उपस्थित राहणार आहेत.
ही बैठक शुक्रवार, दि. २४ जुलै रोजी दुपारी १२ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, रत्नागिरी येथील सभागृहात आयोजित करण्यात आली आहे.
राजापूर व लांजा तालुक्यातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांनी सन २०२५-२६ हंगामात प्रतिकूल हवामान, अवकाळी पाऊस, कीड व रोगांचा प्रादुर्भाव तसेच ९ मे २०२६ रोजी झालेल्या तीव्र वादळामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने विविध मागण्यांचे निवेदन १८ जुलै रोजी मंगलमूर्ती आंबा उत्पादक संघ, आडिवरे यांच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले होते.
या निवेदनामध्ये कर्जमाफीची प्रभावी अंमलबजावणी, ५० हजार रुपयांच्या प्रोत्साहनपर अनुदानासाठी माहिती संकलन, पीक विम्याचा परतावा तातडीने वितरित करणे, रासायनिक खते व कीटकनाशकांवरील वस्तू व सेवा कर (GST) रद्द करण्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा करणे, वन्यप्राण्यांमुळे विशेषतः वानरांकडून होणाऱ्या पिकांच्या नुकसानीवर प्रभावी उपाययोजना करणे तसेच आंबा व काजू पिकांसाठी संशोधन केंद्र आणि अत्याधुनिक परीक्षण प्रयोगशाळा स्थापन करणे अशा एकूण १३ महत्त्वपूर्ण मागण्यांचा समावेश आहे.
या सर्व मागण्यांचा सर्वंकष आढावा घेणे, संबंधित विभागांनी केलेल्या कार्यवाहीची माहिती जाणून घेणे, प्रलंबित विषयांवर समन्वयाने निर्णय घेणे आणि पुढील आवश्यक उपाययोजना निश्चित करणे, या उद्देशाने या विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
या बैठकीला राजापूर व लांजा तालुक्यातील आंबा व काजू उत्पादक शेतकरी तसेच संबंधित विभागांचे अधिकारी यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.



