
जंतर-मंतरवर आंदोलक पुन्हा जमायला सुरुवात, जोरदार घोषणाबाजी सुरु!
दिल्ली येथील जंतर-मंतरवर आज पुन्हा एकदा आंदोलकांनी जमायला सुरुवात केली असून जोरदार घोषणाबाजी सुरू आहे. काल (20 जुलै) झालेल्या हिंसक निदर्शनांच्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांनी संपूर्ण परिसरात प्रचंड बंदोबस्त तैनात केला आहे. सोमवारी झालेली परिस्थिती पुन्हा उद्भवू नये आणि कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी दिल्ली पोलीस पूर्णपणे सतर्क झाले असून संपूर्ण परिसरावर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.
हिंसाचार, तोडफोड अन् दगडफेक
कॉकरोच जनता पार्टीच्या (CJP) ‘संसद चलो’ मोर्चादरम्यान सोमवारी (20 जुलै) हिंसाचार पाहायला मिळाला. या हिंसेनंतर दिल्ली पोलिसांनी तातडीने कारवाई करत कनॉट प्लेस आणि पार्लमेंट स्ट्रीट या दोन वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांमध्ये आंदोलकांविरोधात गुन्हे (FIR) दाखल केले आहेत. कनॉट प्लेस पोलीस ठाण्यात अनोळखी आंदोलकांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. सोमवारी कनॉट प्लेसच्या आऊटर सर्कलमध्ये रीगल सिनेमाजवळ जमावाने प्रचंड गोंधळ घातला होता. यादरम्यान पोलिसांच्या गाड्यांची तोडफोड करण्यात आली आणि पोलिसांच्या पथकावर तुफान दगडफेक करण्यात आली, तसेच जनपथवरील अनेक दुकानांचेही मोठे नुकसान झाले.
60 आंदोलक जखमी
पार्लमेंट स्ट्रीट पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या (BNS) विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये सरकारी मालमत्तेचे नुकसान करणे, दंगल घडवणे, कायदा-सुव्यवस्था बिघडवणे आणि पोलीस कर्मचाऱ्यांवर हल्ला करणे यासारख्या गंभीर कलमांचा समावेश आहे. दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आंदोलकांनी सर्व इशारे आणि सूचना डावलून परिसरात लागू असलेल्या ‘बीएनएस’च्या कलम 163 चे उल्लंघन केले. या दगडफेक आणि चकमकीत 118 पेक्षा जास्त पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. जखमींमध्ये स्पेशल सीपी, जॉइंट सीपी, एडिशनल सीपी, डीसीपी, एडिशनल डीसीपी आणि एसीपी दर्जाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह अनेक महिला पोलिसांचा समावेश आहे. याशिवाय सुमारे 60 आंदोलकही जखमी झाल्याचे वृत्त असून 15 ते 20 सरकारी वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे.
सीसीटीव्ही फुटेज तपासणी
हिंसाचाराच्या घटनेनंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत घटनास्थळावरून सुमारे 70 उपद्रव्यांना ताब्यात घेतले आहे. कायदा आणि सुव्यवस्था हातात घेणाऱ्या आणि हिंसेमध्ये सहभागी असलेल्या कोणत्याही व्यक्तीची गय केली जाणार नाही, असा इशारा दिल्ली पोलिसांनी दिला आहे. सध्या या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून हिंसाचारात सहभागी असलेल्या इतर संशयितांची ओळख पटवण्यासाठी परिसरातील सर्व सीसीटीव्ही (CCTV) फुटेज तपासले जात आहेत.




