
ही लाडकी बहीण नव्हे, लाडकी खुर्ची योजना; सरकारवर भास्कर जाधव यांची जोरदार टीका
अधिवेशनातून जनतेच्या पदरात काहीच पडत नाही; राज्यातील लोकशाही धोक्यात
राज्यातील पावसाळी अधिवेशन हे जनतेच्या प्रश्नांपेक्षा केवळ घोषणाबाजी, विरोधकांवर टीका आणि राजकीय दिखावा यापुरतेच मर्यादित राहिले आहे, असा आरोप उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे नेते तथा आमदार भास्कर जाधव यांनी केला. राज्य सरकारच्या कारभारावर त्यांनी जोरदार टीका करत, “ही लाडकी बहीण योजना नसून लाडकी खुर्ची योजना आहे,” असा घणाघात केला.
पावसाळी अधिवेशनाबाबत बोलताना जाधव म्हणाले, “महाराष्ट्रातील जनतेच्या पदरात अधिवेशनातून काहीच पडत नाही. रोज नवी थाप, विरोधी पक्षाला शिव्या आणि त्यांना बोलू न देण्याचाच प्रकार सुरू आहे. ज्या विभागाची चर्चा असते, त्या विभागाचे मंत्रीच सभागृहात उपस्थित नसतात.”
मंत्री सभागृहात अनुपस्थित राहण्याच्या मुद्द्यावर त्यांनी सरकारवर निशाणा साधत, “एखादा सदस्य एक दिवस गैरहजर राहिला तर नियम लागू होतात. दोन-तीन अधिवेशनांना अनुपस्थित राहूनही रजेचे कारण न दिल्यास कारवाई होऊ शकते. मात्र, याच नियमांचा गैरफायदा मंत्री आणि सत्ताधारी घेत आहेत,” असा आरोप केला.
‘लाडकी बहीण’ आणि मोफत साडी योजनेवर बोलताना जाधव यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर निवडणूकपूर्व आश्वासनांची आठवण करून दिली. “२०१४ मध्ये दोन कोटी रोजगार, काळा पैसा परत आणून प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख रुपये जमा करण्याची घोषणा झाली. ‘वन नेशन, वन इलेक्शन’ची घोषणा झाली. पुलवामा हल्ल्यानंतर आणि राम मंदिर उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर निवडणुका जिंकल्या. मात्र मराठा, धनगर आणि लिंगायत समाजाच्या आरक्षणाचे काय झाले?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
ते पुढे म्हणाले, “लाडकी बहीण योजनेतील तब्बल ९२ लाख लाभार्थी कमी करण्यात आले. दिवाळीत महिलांना दिली जाणारी मोफत साडीही बंद करण्यात आली. त्यामुळे ही योजना महिलांसाठी नसून सत्तेची खुर्ची टिकविण्यासाठी आहे.”
राज्यातील राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना जाधव म्हणाले, “राज्यात लोकशाही धोक्यात आली आहे. ईव्हीएम घोटाळा, मतचोरी, मतदारांची नावे गायब होणे अशा प्रकारातून निवडणुका जिंकल्या जात आहेत. त्यानंतर विरोधी पक्षातील निवडून आलेले लोकप्रतिनिधी विकत घेऊन पक्षात सामील केले जात आहेत. हा लोकशाहीला घातक प्रकार आहे.”
मुंबई लोकलमधील सुरक्षेवरही त्यांनी चिंता व्यक्त केली. “रेल्वेत दिवसाढवळ्या खून, चोरी, महिलांवरील अत्याचार आणि भ्रष्टाचाराच्या घटना वाढल्या आहेत. गृहखाते केवळ पोलिसांची बाजू मांडण्यात व्यस्त असून राज्यातील कायदा व सुव्यवस्था पूर्णपणे रसातळाला गेली आहे. या सरकारच्या काळात कायदा व सुव्यवस्थेबाबत सांगण्यासारखी एकही चांगली गोष्ट उरलेली नाही,” असा आरोप भास्कर जाधव यांनी केला.




