
योगेश कदम यांच्या निधीतून कै. भाऊसाहेब पाटणे व्यापारी संकुलाला संरक्षणात्मक शेड; कामाला वेग
खेड : शहरातील कै. भाऊसाहेब पाटणे व्यापारी संकुलाच्या वरील संरक्षणात्मक शेड उभारणीच्या कामाला वेग आला असून, राज्याचे गृहराज्यमंत्री नामदार योगेश रामदास कदम यांच्या स्थानिक विकास निधीतून मंजूर झालेल्या या कामामुळे व्यापारी आणि गाळेधारकांना मोठा दिलासा मिळणार आहे. अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या या कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाल्याने व्यापारी वर्गातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
पावसाळ्यात पावसापासून तसेच उन्हाळ्यात कडक उन्हापासून संरक्षण मिळावे, यासाठी व्यापारी संकुलावर शेड उभारण्याची मागणी व्यापारी व गाळेधारकांकडून सातत्याने करण्यात येत होती. या मागणीची दखल घेत नामदार योगेश कदम यांच्या स्थानिक विकास निधीतून या कामासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला. त्यानंतर खेड नगरपरिषदेच्या माध्यमातून शेड उभारणीच्या कामाला प्रारंभ करण्यात आला असून सध्या काम वेगाने सुरू आहे.
या कामासाठी नगराध्यक्ष माधवी बुटाला यांनी सातत्याने पाठपुरावा केल्याने प्रलंबित प्रश्न मार्गी लागला. त्यामुळे व्यापारी आणि गाळेधारकांनी नामदार योगेश कदम, नगराध्यक्ष माधवी बुटाला तसेच नगरपरिषदेतील सर्व नगरसेवकांचे आभार व्यक्त केले.
दरम्यान, सुरू असलेल्या कामाची पाहणी मुख्याधिकारी महादेव रोडगे, गटनेते निकेतन पाटणे, बांधकाम सभापती सुनील दरेकर, नगरसेवक प्रेमळ चिखले आणि नगरसेविका संजना कुडाळकर यांनी केली. यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना काम दर्जेदार, सुरक्षित आणि निर्धारित मुदतीत पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
संरक्षणात्मक शेड उभारणीमुळे व्यापारी संकुलातील व्यावसायिकांना वर्षभर पाऊस आणि उन्हापासून संरक्षण मिळणार असून, ग्राहकांनाही अधिक सुविधा उपलब्ध होणार असल्याने या कामाचे व्यापारी वर्गातून स्वागत होत आहे.




