जयंत पाटील, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांची मुख्यमंत्री फडणवीसांशी भेट; राजकीय चर्चांना उधाण


मुंबई : राज्याच्या राजकारणात नव्या चर्चांना तोंड फुटेल अशी एक महत्त्वाची घडामोड बुधवारी घडली. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष खासदार प्रफुल्ल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यासमवेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईतील ‘वर्षा’ शासकीय निवासस्थानी भेट घेतली.

यापूर्वी सुनील तटकरे यांनी महायुती सरकारमध्ये अर्थखाते पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसकडे यावे, अशी भूमिका मांडली होती. त्यानुसार प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेण्यासाठी वर्षा निवासस्थानी दाखल झाले. त्यानंतर काही वेळातच जयंत पाटीलही तेथे पोहोचल्याने या भेटीची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली.

या बैठकीत नेमक्या कोणत्या विषयावर चर्चा झाली, याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र, अलीकडच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या संभाव्य राजकीय भूमिकेबाबत सुरू असलेल्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर या भेटीकडे विशेष लक्ष लागले आहे.

दरम्यान, राज्यात काही महत्त्वाच्या राजकीय घडामोडी घडत असल्याचे संकेत भाजपचे आमदार प्रवीण दरेकर यांनीही दिल्याने या भेटीबाबत विविध तर्कवितर्कांना अधिक बळ मिळाले आहे. मात्र, या बैठकीबाबत कोणतीही अधिकृत भूमिका किंवा निर्णय अद्याप जाहीर करण्यात आलेला नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button