
नवी मुंबईतील कोपरखैरणे पोलीस ठाण्यात सात वर्षांपासून फरार मुख्य आरोपीला अटक
नवी मुंबईतील कोपरखैरणे पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या फसवणूक आणि बनावट कागदपत्रांच्या गंभीर गुन्ह्यातील मुख्य आरोपीला तब्बल सात वर्षांनंतर दापोली पोलिसांनी अटक केली आहे. शाम काशीनाथ सपकाळ असे या अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, तो दीर्घकाळापासून पोलिसांना गुंगारा देत होता.
कोपरखैरणे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपीने न्यायालयीन प्रक्रियेकडे वारंवार पाठ फिरविल्याने बेलापूर येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयाने त्याला फरार घोषित केले होते. दरम्यान, हा आरोपी दापोली तालुक्यात वास्तव्यास असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे दापोली पोलिसांनी स्थानिक पोलीस पाटलांच्या मदतीने अत्यंत शिताफीने सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले. कायदेशीर सोपस्कार पूर्ण केल्यानंतर त्याला पुढील तपासासाठी कोपरखैरणे पोलिसांच्या हवाली करण्यात आले आहे. या यशस्वी कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.




