
निकृष्ट भूमीगत केबल कामावरून मिऱ्यात संताप; महावितरण कार्यालयावर ग्रामस्थांचा मोर्चा
रत्नागिरी : मिऱ्या परिसरात महावितरण आणि खासगी ठेकेदारामार्फत करण्यात आलेल्या भूमीगत वीज केबल आणि स्ट्रीट लाईटच्या कामाच्या दर्जाबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत शेकडो ग्रामस्थांनी सोमवारी महावितरणच्या कार्यालयावर मोर्चा काढला. काम निकृष्ट दर्जाचे असून त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण झाल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी अधिकाऱ्यांना जाब विचारला.
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, भूमीगत केबल आवश्यक त्या खोलीवर न टाकता वरवर टाकण्यात आल्या आहेत. तसेच काही ठिकाणी फिडर आणि डीपीजवळील विद्युत वाहिन्या उघड्यावर असल्याने नागरिक आणि जनावरांना विजेचा धक्का बसण्याच्या घटना घडत असल्याचा दावा करण्यात आला. याशिवाय केबलसाठी बसवलेले लोखंडी बॉक्सही अल्पावधीत गंजून उघडे पडल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले.
या समस्येबाबत ग्रामपंचायतीमार्फत अनेकदा लेखी आणि तोंडी पाठपुरावा करूनही महावितरण आणि संबंधित ठेकेदाराने दखल घेतली नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. त्यामुळे महिलांसह मोठ्या संख्येने नागरिक महावितरण कार्यालयात दाखल झाले आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा होईपर्यंत ठिय्या आंदोलन सुरू केले.
परिस्थिती तणावपूर्ण होताच पोलिसांनी मध्यस्थी केली. अखेरीस महावितरणच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी प्रत्यक्ष घटनास्थळी पाहणी करून आवश्यक उपाययोजना करण्याचे आश्वासन दिल्यानंतर ग्रामस्थांनी आंदोलन तात्पुरते स्थगित केले.




