जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा आरोग्य समिती सभापती विलास चाळके यांची लांजा तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांना भेट

लांजा : जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा आरोग्य समिती सभापती विलास चाळके यांनी ११ जुलै रोजी तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र भांबेड व प्राथमिक आरोग्य केंद्र शिपोशी येथे भेट देऊन आरोग्य सेवांचा तसेच सुरू असलेल्या विकासकामांचा सविस्तर आढावा घेतला.
प्राथमिक आरोग्य केंद्र भांबेड येथे सुरू असलेल्या नवीन इमारतीच्या बांधकामाची त्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. तसेच रुग्णांना आवश्यक औषधे वेळेवर उपलब्ध होत आहेत का, याची खातरजमा करत औषधसाठ्याची पाहणी केली. सर्वसामान्य नागरिकांना दर्जेदार व तत्पर आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील राहण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
त्यानंतर प्राथमिक आरोग्य केंद्र शिपोशी येथे भेट देऊन नव्या इमारतीच्या बांधकामाचा आढावा घेतला. ग्रामीण भागातील नागरिकांना अधिकाधिक आरोग्य सेवा मिळाव्यात, यासाठी ओपीडी संख्या वाढविणे, आरोग्य सेवा अधिक सक्षम करणे तसेच रुग्णाभिमुख सेवा देण्यावर विशेष भर देण्याचे निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांतकुमार परगे, दोन्ही प्राथमिक आरोग्य केंद्रांचे वैद्यकीय अधिकारी तसेच कर्मचारी उपस्थित होते.
याप्रसंगी श्री. चाळके यांनी आरोग्य कर्मचाऱ्यांशी संवाद साधून ग्रामीण भागातील नागरिकांना गुणवत्तापूर्ण, सुलभ व वेळेवर आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी समन्वयाने कार्य करण्याचे आवाहन केले. तसेच शासनाच्या विविध आरोग्य योजना प्रभावीपणे राबवून अधिकाधिक लाभार्थ्यांपर्यंत त्या पोहोचविण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button