
चिपळूण ते पंढरपूर: ‘सायकलवारी’साठी दापोली सायकलिंग क्लबचे सदस्य मार्गस्थ
चिपळूण: आलेकर बंधू चिपळूण यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘सायकलवारी’ या अनोख्या उपक्रमासाठी दापोली सायकलिंग क्लबच्या सदस्यांनी उत्साहात प्रस्थान केले आहे. १० आणि ११ जुलै रोजी आयोजित या सायकलवारीमध्ये सहभागी होण्यासाठी हे सायकलपटू सज्ज झाले आहेत.
पंढरीच्या वारीची परंपरा आणि सायकलिंगची आवड यांचा मेळ घालत ‘सायकल चालती पंढरीची वाट’ हे ब्रीदवाक्य घेऊन हा उपक्रम राबवण्यात येत आहे. या वारीत सहभागी होणाऱ्या दापोली सायकलिंग क्लबच्या टीममध्ये सुनील रिसबूड, राजेंद्र नाचरे, मंदार वझे, निनाद देवरुखकर, प्रशांत पालवणकर आणि सुनील शिंदे यांचा समावेश आहे.
गेल्या काही वर्षांत आरोग्याविषयीची जागरूकता वाढवण्यासाठी सायकलिंगकडे कल वाढला आहे. त्यातच वारकरी संप्रदायाचा हा पंढरपूरचा मार्ग सायकलने पूर्ण करून हे सायकलपटू एक वेगळा संदेश देत आहेत. या उपक्रमाबद्दल स्थानिक स्तरावर मोठे कौतुक होत आहे.




