जगबुडी-नारंगी नद्यांचा रौद्रावतार; खेड बाजारपेठेत पुराचे पाणी, दापोली मार्ग बंद, हजारो हेक्टर शेती जलमय


रत्नागिरी जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे खेड तालुक्यात पूरस्थिती गंभीर बनली असून जगबुडी आणि नारंगी या दोन्ही नद्यांनी धोकादायक पातळी गाठली आहे. जगबुडी नदीने रविवारी सकाळी धोक्याची पातळी ओलांडल्यानंतर सायंकाळपर्यंत पाणीपातळी ९.८० मीटरवर पोहोचली. परिणामी नदीचे पाणी थेट खेड शहरातील बाजारपेठेत शिरल्याने व्यापारी आणि नागरिकांची मोठी धावपळ उडाली.

पुराच्या पाण्याने शहरातील मटण-मच्छी मार्केट, तीनबत्ती नाका, वाल्की गल्ली, निवाचा चौक, पान गल्ली आणि पोत्रिक मोहल्ला या परिसरांना वेढा घातला. अनेक दुकानदारांना आपला माल सुरक्षित ठिकाणी हलविण्यासाठी धावपळ करावी लागली, तर काहींना अचानक वाढलेल्या पाण्यामुळे माल हलविण्याची संधीही मिळाली नाही.

पूराचा धोका लक्षात घेऊन प्रशासनाने सकाळपासून तीन वेळा सायरन वाजवून नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला. नगरपरिषद, महसूल विभाग, पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापन पथके दिवसभर परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून होती.

दुसरीकडे, नारंगी नदीलाही मोठा पूर आल्याने नदीचे पाणी पात्राबाहेर आले. सुर्वे इंजिनिअरिंगजवळील नव्या मोरीवरून पाणी वाहू लागल्याने खेड–दापोली–मंडणगड मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली. तसेच खेड-खाडीपट्टा आणि सुसेरी मार्गावरील काही पुलांवरूनही पाणी गेल्याने अनेक गावांचा संपर्क तात्पुरता तुटला.

पूरामुळे नारंगी नदीकाठावरील हजारो हेक्टर भातशेती पाण्याखाली गेली असून शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. स्मशानभूमी, वीटभट्ट्या आणि सखल भागातील शेतीही जलमय झाली आहे.

दरम्यान, पूराचा परिणाम वाहतुकीवरही झाला आहे. खेड आगारातून सुटणाऱ्या मुंबई-बोरिवलीसह ग्रामीण भागातील अनेक एसटी फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. मुंबई-गोवा महामार्गावरील काही ठिकाणी पाणी साचल्याने वाहतूक संथ गतीने सुरू असून, अनेक ठिकाणी झाडे कोसळल्यानेही अडथळे निर्माण झाले आहेत.

खेड शहरातील खांबतळे झोपडपट्टीतील ४५ नागरिकांना खबरदारीचा उपाय म्हणून सम्राट अशोक नगर येथील बालवाडी इमारतीत सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे.

हवामान विभागाने पुढील ४८ तास अतिमुसळधार पावसाचा इशारा दिल्याने प्रशासनाने संपूर्ण यंत्रणा सज्ज ठेवली आहे. नागरिकांनी नदी, ओढे, पूरग्रस्त रस्ते आणि सखल भागांपासून दूर राहावे, तसेच अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button