
रत्नागिरी नगर परिषदेने एक अत्यंत महत्त्वाकांक्षी पाऊल, रत्नागिरीत ८१ कोटींचा मलशुद्धीकरण प्रकल्प
रत्नागिरी शहरातून समुद्रात सोडण्यात येणार्या सांडपाण्यामुळे होणारे सागरी प्रदूषण रोखण्यासाठी आणि सागरी पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी रत्नागिरी नगर परिषदेने एक अत्यंत महत्त्वाकांक्षी पाऊल उचलले आहे. शहराचे सांडपाणी समुद्रात वाहून नेणार्या मुख्य ७ नाल्यांवर वेगवेगळ्या ठिकाणी आधुनिक मलशुद्धीकरण केंद्र उभारण्यात येणार आहेत. राष्ट्रीय हरित लवादाच्या कडक निकषांनुसार सांडपाणी पूर्णपणे शुद्ध केल्यानंतरच समुद्रात सोडले जाणार आहे. यासाठी सुमारे ८१ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहे.
रत्नागिरी नगर परिषदेची सर्वसाधारण सभा मंगळवारी नगराध्यक्ष शिल्पा सुर्वे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. सभेत आधुनिक मलशुद्धीकरण प्रकल्पावर प्रकर्षाने चर्चा झाली. या प्रकल्पामुळे रत्नागिरीचे विस्तीर्ण समुद्रकिनारे स्वच्छ आणि सुरक्षित राहण्यास मोठी मदत होणार आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे नियोजन आणि तांत्रिक काम नगर परिषदेने वेगाने सुरू केले आहे.
नवी मुंबई-बेलापूर येथील नामांकित एस इंजिनिअरिंग कन्सल्टंट कंपनीकडे या कामाची धुरा सोपवण्यात आली आहे. कन्सल्टंट एस इंजिनिअरिंग कंपनीमार्फत रत्नागिरी शहर आणि किनारपट्टी भागाचा सविस्तर सर्व्हे यशस्वीरित्या पूर्ण झाला असल्याची माहिती सभेत देण्यात आली. शहरात कोणत्या भागात सांडपाणी गोळा होते आणि ते कुठून समुद्रात जाते, याचा सूक्ष्म अभ्यास करूनच सात जागा निश्चित करण्यात आल्या आहेत.




