गुहागर येथील गोल्डमॅन व कासवमित्र विश्वास खरे खून प्रकरणाचा अखेर तब्बल १२ वर्षांनी निकाल, दोन आरोपींना जन्मठेप


गुहागर येथील गोल्डमॅन व कासवमित्र विश्वास खरे खून प्रकरणाचा अखेर तब्बल १२ वर्षांनी निकाल लागला आहे. चिपळूण येथील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश बी. बी. भालटकर यांनी या खूनप्रकरणी दोन आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे, तर तिसर्‍या आरोपीची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.खरे खून प्रकरण गुहागरसह जिल्हाभरात त्यावेळी गाजले होते.

अमोल चंद्रकांत गाढवे (रा. बोपखे, जि. पुणे) व किरण रामदास कुचेकर (रा. उत्तमनगर, पुणे) अशी जन्‍मठेप झालेल्‍या आरोपींची नावे आहेत, तर विष्णू किसन तनपुरे (रा. दिघी, पुणे) याची निर्दोष मुक्‍तता झाली आहे. गुहागर येथील विश्वास महादेव खरे यांचा १ ऑक्टोबर २०१४ रोजी खरे प्लेजर पॉईंट या होम स्टे येथे मान कापून खून केला होता. चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील दहा तोळे सोन्याची चेन चोरीच्या उद्देशाने पर्यटक म्हणून आलेल्या चोरांनी विळा व सुरा याने २१ वार करून मान कापली होती आणि दहा तोळे सोन्याची चेन चोरून नेली होती. याप्रकरणी गुहागर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. या खुनानंतर तीन महिन्यांनी रत्नागिरी स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखा व गुहागर पोलिसांनी तीन आरोपींना जेरबंद केले होते. यामध्ये अमोल गाढवे, किरण कुचेकर व त्यांना माहिती देणारा विष्णू तनपुरे यांना जानेवारी २०१५ मध्ये अटक करण्यात आली होती.या प्रकरणी सुरुवातीला खेड सत्र न्यायालयात व नंतर चिपळूण जिल्हा सत्र न्यायालयात अ‍ॅड. प्रफुल्ल साळवी यांनी आरोपींच्या विरोधात भक्कम बाजू मांडली व ५१ साक्षीदार तपासले. सरकारी वकील अ‍ॅड. साळवी यांनी उलट तपास करून या प्रकरणात दोन्ही आरोपी घटनेच्या दिवशी गुहागरमध्ये होते व नंतर ते पुणे येथे गेले हे न्यायालयात सिद्ध केले. तसेच या प्रकरणातील आरोपींनी सोनाराला चेन विकल्याचे न्यायालयात सिद्ध झाले. पर्यटक बनून आलेल्या अमोल गाढवे व किरण कुचेकर या दोघांनीच खून केल्याचे पुराव्याद्वारे न्यायालयात सिद्ध झाले. मात्र तिसरा आरोपी विष्णू तनपुरे याची सबळ पुराव्‍याअभावी निर्दोष मुक्‍तता करण्‍यात आली.तत्कालीन पोलिस निरीक्षक विनित चौधरी यांनी हा तपास केला होता. येथील न्यायाधीश बी. बी. भालटकर यांनी सलग युक्तिवाद ऐकला व बारा वर्षे प्रलंबित असलेल्या प्रकरणाचा त्यांनी निकाल जाहीर केला. या प्रकरणात गुहागर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सचिन सावंत, पैरवी अंमलदार प्रदीप भंडारी, आशिष शिंदे यांनी काम पाहिले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button