रत्नागिरी जिल्हा परिषदेत ग्रामीण भागाचा चेहरामोहरा बदलण्यासाठी ४५ कोटींचा आराखडा मंजूर


रत्नागिरी जिल्ह्यातील ग्रामीण भागाचा चेहरामोहरा बदलण्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार्‍या १५ व्या वित्त आयोगाच्या ४५ कोटी रुपयांच्या विकास आराखड्याला रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या विशेष सर्वसाधारण सभेत एकमुखाने मंजुरी देण्यात आली. सर्व सदस्यांना विश्वासात घेऊन निधीचे समान वाटप केले जाईल, अशी महत्त्वाची ग्वाही सत्ताधार्‍यांकडून देण्यात आली. या सभेमध्ये जिल्ह्याच्या प्रगतीला गती देणारे अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.
जिल्हापरिषदेत मंगळवारी झालेल्या या सभेच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद अध्यक्षा अस्मिता केंद्रे होत्या. ही सभा सौहार्दपूर्ण आणि खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. यावेळी विरोधी पक्षनेते विक्रांत जाधव यांनी मांडलेल्या सूचना आणि यावेळी विरोधकांनी मांडलेल्या मुद्यांचा आदर करत, सभा उत्साहात पार पडली.
या विशेष सभेत ४५ कोटी रुपयांच्या निधीच्या विनियोगाचा लेखाजोखा मांडण्यात आला. त्यानुसार, ६० टक्के बंधित निधीतून एकूण रकमेतील ३० टक्के हिस्सा थेट ग्रामीण भागातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी खर्च होणार आहे. यामध्ये नव्या विंधन विहिरी, बोअरवेल दुरुस्ती आणि रेन वॉटर हार्वेस्टिंगच्या कामांना प्राधान्य दिले जाईल. तर उर्वरित ३० टक्के रक्कम ही सांडपाणी व्यवस्थापन, कचरा विल्हेवाट आणि बंदिस्त गटारांसारख्या स्वच्छता मोहिमेसाठी वापरली जाणार आहे, ज्यामुळे गावागावांतील आरोग्याचा दर्जा सुधारण्यास मदत होईल.
तर दुसया बाजूला, स्थानिक निकडीनुसार कामांची निवड करण्यासाठी ४० टक्के अबंधित निधीचे नियोजन करण्यात आले आहे. यातील ३६ टक्के मोठा निधी अंगणवाड्यांची सुरक्षा, शाळांची दुरवस्था रोखणे, प्राथमिक आरोग्य केंद्रांचे सक्षमीकरण आणि गावा जोडणारे रस्ते व पाखाड्यांच्या बांधकामासाठी वळवण्यात आला आहे, तर केवळ ४ टक्के रक्कम प्रशासकीय कामकाजासाठी बाजूला ठेवली आहे. याशिवाय समाजकल्याण आणि शेवटच्या घटकाचा विकास डोळ्यासमोर ठेवून शिक्षण, आरोग्य, उपजीविका (२५ टक्के) आणि महिला व बालकल्याण विभागासाठी (१० टक्के) विशेष बजेट मंजूर करण्यात आले.
या सविस्तर चर्चेत अण्णा कदम आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे संतोष थेराडे यांनीही आक्रमकपणे भाग घेत स्थानिक प्रश्न प्रशासनासमोर मांडले, अध्यक्षा अस्मिता केंद्रे यांनी सर्वांना सोबत घेत समन्वय साधल्याने ही सर्वसाधारण सभा जिल्ह्याच्या विकासाला दिशा देणारी ठरली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button