मिरजोळे-उक्षी मार्गावर दोन बसची समोरासमोर धडक; १५ विद्यार्थी जखमी


रत्नागिरी, दि. २ जुलै : मिरजोळे-उक्षी मार्गावरील फणसवले पवार कोंड येथे गुरुवारी सकाळी साडेसातच्या सुमारास दोन बसमध्ये समोरासमोर जोरदार धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात पटवर्धन हायस्कूल व महाविद्यालयातील १५ विद्यार्थी-विद्यार्थिनी जखमी झाले असून, एका बस चालकाच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

भावे आडोम येथून विद्यार्थ्यांना घेऊन रत्नागिरीकडे येणारी बस फणसवले परिसरात पोहोचली असता समोरून येणाऱ्या दुसऱ्या बसशी तिची जोरदार धडक झाली. धडकेनंतर बसमधील विद्यार्थ्यांनी आरडाओरडा केल्याने स्थानिक नागरिक तातडीने घटनास्थळी धावले. त्यांनी जखमी विद्यार्थ्यांना बसमधून सुरक्षित बाहेर काढून त्वरित जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले.

अपघाताची माहिती मिळताच विद्यार्थ्यांच्या पालकांनीही रुग्णालयात धाव घेतली. त्यामुळे काही काळ रुग्णालय परिसरात गर्दीचे वातावरण निर्माण झाले होते. जखमी विद्यार्थ्यांवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळाली आहे.

या अपघातात सुजल सनगरे (१७), सिद्धेश खापणे (१७), तन्वी रेवाळे (१६), आदिती सत्यवान कांबळे (१७), तेजस्विनी अशोक खापणे (१७), कल्याणी रेवाळे (१७) यांच्यासह एकूण १५ विद्यार्थी-विद्यार्थिनी जखमी झाले आहेत. सर्व जखमी भावे आडोम येथील रहिवासी असून त्यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

दरम्यान, अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button