देवरूखच्या क्रीडा विकासासाठी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अभिजीत शेट्ये व तालुका सरचिटणीस संदीप वेलवणकर यांनी खासदार नारायण राणे यांची घेतली भेट

खेलो इंडियाअंतर्गत बहुउद्देशीय क्रीडा संकुलाची निवेदनाद्वारे केली मागणी

संगमेश्व : देवरूखसह संगमेश्वर तालुक्यातील युवक-युवती आणि खेळाडूंसाठी केंद्र सरकारच्या खेलो इंडिया योजनेअंतर्गत देवरूख येथे बहुउद्देशीय क्रीडा संकुल उभारण्यात यावे, अशी मागणी भारतीय जनता पार्टी रत्नागिरीचे जिल्हा उपाध्यक्ष अभिजीत शेट्ये आणि संगमेश्वर तालुका सरचिटणीस संदीप वेलवणकर यांनी रत्नागिरी-सिंधुदुर्गचे खासदार नारायण राणे यांची भेट घेऊन निवेदनाद्वारे केली आहे.

देवरूख हे संगमेश्वर तालुक्याचे मुख्यालय असून तालुक्यातील हजारो विद्यार्थी, युवक-युवती आणि खेळाडू शिक्षण, सराव तसेच विविध क्रीडा स्पर्धांसाठी देवरुख येथे येतात. मात्र, या परिसरात अद्याप राष्ट्रीय दर्जाच्या आणि सर्वसमावेशक क्रीडा सुविधा उपलब्ध नसल्याने खेळाडूंना सरावासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. या पार्श्वभूमीवर देवरुख येथे आधुनिक व सर्व सुविधांनी युक्त बहुउद्देशीय क्रीडा संकुल उभारण्याची मागणी करण्यात आली. प्रस्तावित क्रीडा संकुलामध्ये क्रिकेट मैदान, फुटबॉल मैदान, ४०० मीटर धावपट्टी, कबड्डी, खो-खो, व्हॉलीबॉल, बास्केटबॉल, बॅडमिंटन, मल्टिपर्पज इनडोअर स्पोर्ट्स हॉल, कुस्ती-ज्यूदो-बॉक्सिंग प्रशिक्षण सुविधा, आधुनिक व्यायामशाळा, प्रेक्षक गॅलरी तसेच आवश्यक पूरक सुविधांचा समावेश करण्याची मागणी करण्यात आली.

या क्रीडा संकुलामुळे संगमेश्वर तालुक्यातील विद्यार्थी आणि खेळाडूंना दर्जेदार प्रशिक्षण व सरावाच्या सुविधा उपलब्ध होतील. ग्रामीण भागातील गुणवान खेळाडूंना राज्य, राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रगती करण्यासाठी व्यासपीठ मिळेल. त्याचबरोबर युवकांमध्ये आरोग्यदायी जीवनशैली, शिस्त, क्रीडा संस्कृती आणि व्यसनमुक्तीला चालना मिळण्यास मदत होणार आहे. या मागणीला खासदार नारायण राणे यांनी सकारात्मक प्रतिसाद देत संबंधित पातळीवर तत्काळ आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. त्यामुळे देवरुखच्या क्रीडा विकासाच्या दृष्टीने हा महत्त्वपूर्ण टप्पा मानला जात आहे. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव, जिल्हा सरचिटणीस ओंकार फडके, रत्नागिरी शहराध्यक्ष दादा ढेकणे, नंदू चव्हाण, संगमेश्वर उत्तर मंडल अध्यक्ष विनोद म्हस्के, संगमेश्वर तालुका सरचिटणीस संदीप वेलवणकर तसेच भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button