
राजापूर तालुक्यातील मोसम येथील सरवणकरवाडी परिसरातरेल्वेच्या धडकेत चार दुभत्या म्हशी ठार; शेतकऱ्याचे सुमारे पाच लाखांचे नुकसान
राजापूर तालुक्यातील मोसम येथील सरवणकरवाडी परिसरात रेल्वेच्या धडकेत चार दुभत्या म्हशी जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या दुर्घटनेत संबंधित शेतकऱ्याचे सुमारे पाच लाख रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत असून, रेल्वे मार्गालगत संरक्षक फेन्सिंग नसल्याचा गंभीर प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तळगाव येथील एका शेतकऱ्याच्या चार दुभत्या म्हशी चाऱ्याच्या शोधात मोसम येथील सरवणकरवाडी परिसरातील रेल्वे मार्गालगत गेल्या होत्या. त्याचवेळी भरधाव रेल्वेची धडक बसल्याने चारही म्हशी जागीच ठार झाल्या. दुभती जनावरे दगावल्याने संबंधित शेतकऱ्यावर मोठे आर्थिक संकट कोसळले असून, परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, राजापूर तालुक्यातून जाणाऱ्या रेल्वे मार्गाच्या अनेक भागांमध्ये आजही संरक्षक फेन्सिंग उभारण्यात आलेले नाही. त्यामुळे जनावरे सहजपणे रेल्वे रुळांवर पोहोचतात आणि भरधाव रेल्वेच्या धडकेत त्यांचा मृत्यू होतो. यापूर्वीही बैल, गायी आणि म्हशी रेल्वेच्या धडकेत दगावल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. मात्र, या दुर्घटना रोखण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत.
तालुक्यात दरवर्षी डिसेंबर महिन्यानंतर अनेक ठिकाणी गुरे मोकाट सोडण्याची प्रथा असल्याने जनावरे चाऱ्याच्या शोधात रेल्वे मार्गालगत फिरत असतात. फेन्सिंगचा अभाव असल्यामुळे ती थेट रेल्वे रुळांवर जातात आणि अपघातांना बळी पडतात. त्यामुळे रेल्वे मार्गाच्या दोन्ही बाजूंना मजबूत संरक्षक फेन्सिंग उभारणे ही काळाची गरज असल्याचे मत ग्रामस्थांनी व्यक्त केले आहे.
दुर्घटनेत जनावरे दगावल्यानंतर शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारची नुकसानभरपाई मिळत नसल्याने त्यांच्यावर दुहेरी आर्थिक संकट ओढवते. शेतीसोबत दुग्धव्यवसायावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांसाठी दुभत्या जनावरांचा मृत्यू म्हणजे मोठा आर्थिक धक्का ठरत आहे.
या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाने या गंभीर प्रश्नाची तातडीने दखल घेऊन राजापूर तालुक्यातील संपूर्ण रेल्वे मार्गालगत प्रभावी संरक्षक फेन्सिंग उभारावे, जनावरांचे होणारे अपघाती मृत्यू रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्याला योग्य आर्थिक नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी ग्रामस्थ आणि शेतकरी वर्गातून जोर धरत आहे.




