तुकाराम मुंडे यांची नजर आता रक्तपेढ्यांवर, FDA ची दोन रक्तपेढ्यांवर मोठी कारवाई; रक्तसंकलनासह सर्व सेवा तात्पुरत्या बंद


मुंबई : अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागाने नियमांचे गंभीर उल्लंघन आढळून आल्याने मुंबईतील जे. जे. महानगर रक्तपेढी आणि बदलापूर येथील माया ब्लड सेंटर यांच्या परवान्यांवर कठोर कारवाई करत पुढील आदेशापर्यंत रक्तसंकलन, प्रक्रिया आणि वितरणासह सर्व कामकाज तात्पुरते बंद करण्याचे आदेश दिले आहेत.

अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या तपासणीत रक्तसंकलन, साठवणूक, तपासणी, गुणवत्ता नियंत्रण आणि आवश्यक अभिलेख ठेवण्यात गंभीर त्रुटी आढळल्याचे सांगण्यात आले. तसेच औषधे व सौंदर्य प्रसाधने अधिनियम आणि संबंधित नियमांचे उल्लंघन झाल्याचेही निदर्शनास आले.

FDA आणि केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्थेच्या संयुक्त पथकाने दोन्ही रक्तपेढ्यांची तपासणी केली. जे. जे. महानगर रक्तपेढीत रक्ताच्या हाताळणीसंदर्भातील प्रक्रियांमध्ये अनेक त्रुटी आढळल्या. तर बदलापूर येथील माया ब्लड सेंटरमध्ये रक्तवाहतुकीच्या नोंदींचा अभाव, उपकरणांचे कालबाह्य प्रमाणीकरण, गुणवत्ता नियंत्रण चाचण्यांतील त्रुटी, जैववैद्यकीय कचरा व्यवस्थापनातील अनियमितता तसेच रक्तदान शिबिरांसाठी आवश्यक मंजुरी आणि अभिलेख नसल्याचे निदर्शनास आले.

या पार्श्वभूमीवर दोन्ही रक्तपेढ्यांमधील रक्तघटक निर्मिती, परीक्षण, साठवणूक, वितरण, विक्री तसेच रक्तदान शिबिरांचे आयोजन यासह सर्व प्रकारचे कामकाज पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

याबाबत आयुक्त तुकाराम मुंढे यांनी, रक्त ही जीवनरक्षक बाब असल्याने त्याचे संकलन, प्रक्रिया आणि वितरण यामध्ये सुरक्षितता व पारदर्शकता अत्यावश्यक आहे. रक्तदाता आणि रुग्णांच्या आरोग्याशी कोणताही निष्काळजीपणा खपवून घेतला जाणार नाही. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या रक्तपेढ्यांवर यापुढेही कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा दिला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button