
पहिल्या पावसातील मळ्याच्या माशांसाठी खवय्यांची झुंबड; भरणे नाका येथे नागरिकांची गर्दी

खेड : पहिल्या पावसाच्या प्रवाहात पकडल्या जाणाऱ्या मळ्याच्या माशांसाठी खवय्यांनी भरणे नाका येथे मोठी गर्दी केली. भरणे पुलाखाली आदिवासी महिलांनी दोन ते तीन टोपल्या भरून आणलेल्या ताज्या मळ्याच्या माशांची विक्री होताच नागरिकांनी खरेदीसाठी झुंबड उडवली. पहिल्या पावसाच्या पाण्याबरोबर बांध, ओढे आणि नदीच्या प्रवाहात येणारे हे मासे चवीला अत्यंत रुचकर असल्याची धारणा असल्याने पावसाळ्याच्या सुरुवातीलाच त्यांना मोठी मागणी असते. त्यामुळे खवय्ये अशा माशांची आतुरतेने वाट पाहत असतात. आज विक्रीसाठी आणलेल्या मळ्याच्या माशांचा दर प्रति किलो ४०० रुपये होता. दर तुलनेने जास्त असूनही ग्राहकांनी मोठ्या उत्साहाने माशांची खरेदी केली.
हे मासे तालुक्यातील तळे येथील नदीच्या पाण्यात पकडण्यात आले होते. ताजे आणि नैसर्गिक पद्धतीने मिळणारे हे मासे असल्याने भरणे नाका येथे सकाळपासूनच ग्राहकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. पावसाळ्याच्या सुरुवातीला अशा मळ्याच्या माशांची मागणी आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.




