
राष्ट्रीयकृत बँकांमार्फत तृतीयपंथीयांना स्वयंरोजगार व व्यवसायासाठी बीज भांडवल योजना
रत्नागिरी, दि.16 ) : राष्ट्रीयकृत बँकामार्फत तृतीयपंथीय व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी छोट्या व्यवसायांसाठी कर्ज उपलब्ध करुन देण्यासाठी स्वयंरोजगार व व्यवसायासाठी बीज भांडवल योजना राबविण्यात येत आहे. तरी अधिक माहितीसाठी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, कुवारबांव, रत्नागिरी याठिकाणी संपर्क करण्याचे आवाहन सहायक आयुक्त दीपक घाटे यांनी केले आहे.
जिल्ह्यातील तृतीयपंथीयांना स्वयंरोजगार व व्यवसायाची संधी उपलब्ध करुन देवुन त्यांचा आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक विकास घडवुन आणण्यासाठी बीज भांडवल योजना शासनाने सुरु केली आहे. या योजनेअंतर्गत लाभार्थ्यास लघु कर्ज योजनेअंतर्गत रुपये पंचवीस हजार, मध्यम कर्ज योजनेअंतर्गत रुपये पन्नास हजार, दीर्घ कर्ज योजनेअंतर्गत रुपये दोन लाख इतकी रक्कम मिळेल. याबरोबर लाभार्थ्यास स्वयंरोजगारासाठी किंवा व्यवसायासाठी आवश्यक असणाऱ्या भांडवलापैकी ५ टक्के रक्कम स्वत लाभार्थ्याने भरावयाची असून ४५ टक्के रक्कम शासन अनुदानामार्फत तर ५० टक्के रक्कम कर्ज स्वरुपात मिळणार आहे.
योजनेचा लाभ मिळविण्यासाठी लाभार्थ्याकडे तृतीयपंथी व महाराष्ट्र राज्याचा किमान दहा वर्षे रहिवासी असल्याबाबत अधिवास प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. सक्षम प्राधिकारी यांनी निर्गमित केलेले ओळखपत्र असणे आवश्यक आहे. लाभार्थी हा 18 ते 50 या वयोगटातील व्यवसाय करण्यासाठी सक्षम असावा. बीज भांडवल योजनेंतर्गत कर्जदारास कोणत्याही प्रकारच्या जामीनदाराची गरज नाही तसेच कोणत्याही प्रकारचे तारण ठेवावे लागणार नाही. लाभार्थ्याने अर्ज करतेवेळी यापूर्वी इतर कोणत्याही बीज भांडवल योजनेचा लाभ घेतलेला नसावा व तृतीयपंथीय लाभार्थ्याने व्यवसायासाठी कौशल्य असल्यास नमूद करणे आवश्यक आहे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्याकडे सक्षम प्राधिका-याने निर्गमित केलेले ओळखपत्र, रेशन कार्ड/निवडणूक मतदान ओळखपत्र/विद्युत देयक/पॅनकार्ड/घराची टॅक्स पावती/भाडे करारपत्र इत्यादी., लाभार्थी जो व्यवसाय करणार आहे किंवा करत असल्यास त्याचा परवाना व स्थायी पत्ता, व्यवसायासाठी लागणारी सामुग्री किंवा यंत्र सामुग्री इत्यादीचे कोटेशन व बिले, व्यवसाय ज्या ठिकाणी करणार आहे त्या जागेचा 7/12 उतारा/प्रकल्पासाठी जागा भाडे तत्वावर घेणार असल्यास भाडेकरारनामा, व्यवसायाच्या जागेचे ठिकाण भाडेकराराने असल्यास जागा मालकाचे ना हरकत प्रमाणपत्र, स्थानिक स्वराज्य संस्थेचे व्यवसाय करण्याबाबत ना हरकत प्रमाणपत्र, अर्जदारचे 2 फोटो ही कागदपत्रे असणे आवश्यक आहे.




