इयत्ता ६ वीच्या इतिहास व नागरिकशास्त्राच्या पाठ्यपुस्तकात कोंकणातील कातळशिल्पांची तोंडओळख


हजारो वर्षांपूर्वीच्या मानवी जीवनाचे साक्षीदार असलेला कोंकणातील कातळशिल्परूपी अमूल्य वारसा आता विद्यार्थ्यांच्या अभ्यासाचा भाग होणार आहे.

कातळशिल्प विषय अभ्यासक्रमात समाविष्ट केल्याबद्दल
महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती आणि अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे तसेच मंडळातील इतिहास समिती सदस्य, समीक्षक, लेखक, संयोजक आणि या विषय पाठ्यपुस्तकात यावा यासाठी ज्ञात, अज्ञात मंडळींचे विशेष आभार आणि मनःपूर्वक धन्यवाद

कातळशिल्प विषय अभ्यासक्रमात समाविष्ट झाल्याने आता विद्यार्थ्यांना केवळ कातळशिल्पांची माहिती मिळणार नाही, तर हजारो वर्षांपूर्वीच्या मानवाच्या जीवनशैलीची, विचारविश्वाची आणि कलात्मक अभिव्यक्तीची ओळख होईल. आपल्या परिसरातही जागतिक महत्त्वाचा सांस्कृतिक वारसा दडलेला आहे, याची जाणीव त्यांना होईल. इतिहास हा केवळ पुस्तकातील विषय नसून आपल्या आजूबाजूच्या भूमीत जिवंत आहे, हे ते अनुभवतील. या जाणिवेतून वारशाविषयी अभिमान, जतनाची जबाबदारी आणि शोधक वृत्ती या मूल्यांची बीजे त्यांच्या मनात रुजतील.

कातळशिल्पांचा पाठ्यपुस्तकात समावेश होणे हा केवळ अभ्यासक्रमातील एक भाग नव्हे, तर महाराष्ट्राच्या प्रागैतिहासिक सांस्कृतिक वारशाच्या जतन आणि संवर्धनाच्या दिशेने टाकले गेलेले एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.

आमच्यासाठी हा क्षण विशेष भावनिक आहे. गेली 15 वर्षांपेक्षा अधिक काळ कोंकणातील कातळशिल्पांच्या शोध, संशोधन, संवर्धन आणि जनजागृतीसाठी आम्ही तन, मन आणि धन अर्पण करून कार्य करत आहोत. कातळशिल्प स्थळांचा शोध, त्यांची शास्त्रीय नोंद, स्थानिक लोकांमध्ये जनजागृती, तसेच या अमूल्य वारशाच्या संरक्षणासाठी सातत्याने केलेल्या प्रयत्नांमुळे कातळशिल्पांचा विषय समाजापर्यंत, संशोधकांपर्यंत आणि शासनापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न आम्ही अविरतपणे केला आहे.

आज या विषयाचा शालेय अभ्यासक्रमात समावेश होताना दिसतो, तेव्हा या दीर्घ आणि खडतर प्रवासातील प्रयत्नांना अर्थ प्राप्त झाल्याची भावना मनात दाटून येते.

“कातळावर कोरलेल्या त्या आदिम रेषांनी हजारो वर्षांचा प्रवास करून आज पाठ्यपुस्तकात स्थान मिळवले आहे आता त्या केवळ पुस्तकाच्या पानांवर न राहता प्रत्येक विद्यार्थ्याच्या कुतूहलात, विचारांत आणि संवेदनशील मनात कोरल्या जाव्यात; त्यातून भविष्यातील संशोधक, संवर्धक आणि आपल्या सांस्कृतिक वारशाचा अभिमान बाळगणारा सजग नागरिक घडावा, हीच या संपूर्ण प्रवासाची खरी कमाई.”

सुधीर (भाई) रिसबूड,
धनंजय (दादा) मराठे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button