इंग्लंडच्या काऊंटी क्रिकेटमध्ये रत्नागिरीच्या अविराजची पुन्हा दमदार कामगिरी; ६ विकेट्ससह दुसऱ्यांदा ‘सामनावीर’


रत्नागिरी, दि. १ : इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या काऊंटी क्रिकेट लीगमध्ये रत्नागिरीचा युवा क्रिकेटपटू अविराज अनिल गावडे याने पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजीची छाप पाडली आहे. नॉर्थविक पार्क क्रिकेट क्लबविरुद्धच्या सामन्यात त्याने भेदक गोलंदाजी करत ९ षटकांत केवळ ३.१६ च्या इकॉनॉमीने ६ बळी घेत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. या उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्याला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले.

सामन्यात पेशवा क्रिकेट क्लबने प्रथम गोलंदाजी करत नॉर्थविक पार्क क्रिकेट क्लबचा डाव अवघ्या १०० धावांत गुंडाळला. यामध्ये अविराजच्या गुगलीसमोर प्रतिस्पर्धी फलंदाज अक्षरशः हतबल झाले. त्याच्या अचूक आणि प्रभावी गोलंदाजीमुळे प्रतिस्पर्धी संघाला मोठी धावसंख्या उभारता आली नाही.

१०१ धावांचे माफक लक्ष्य गाठताना पेशवा क्रिकेट क्लबच्या सलामीवीरांनी एकही विकेट न गमावता विजय मिळवला. संघाने तब्बल १० विकेट्स राखून सामना जिंकत एकतर्फी विजयाची नोंद केली.

या हंगामात अविराजने दुसऱ्यांदा सामनावीर पुरस्कार पटकावला असून, यापूर्वीही अलेक्झांडर पार्क क्रिकेट क्लब आणि लंडन टायगर्सविरुद्धच्या सामन्यांमध्ये त्याने अष्टपैलू कामगिरी करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. इंग्लंडच्या काऊंटी क्रिकेटमधील त्याची सातत्यपूर्ण कामगिरी रत्नागिरीच्या क्रिकेटप्रेमींसाठी अभिमानाची बाब ठरत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button