वजनानुसार दररोज किती पाणी प्यावे? भरपूर पाणी प्यावं, म्हणजे नेमकं किती? जाणून घ्या अचूक फॉर्म्युला!

: निरोगी राहण्यासाठी भरपूर पाणी प्या, असा सल्ला डॉक्टर आणि तज्ज्ञ नेहमीच देत असतात. अनेक जण दररोज किमान २ ते ३ लिटर पाणी पिणं आवश्यक आहे, असं मानून त्याच प्रमाणात पाणी पितात. पण, हा नियम प्रत्येकासाठी सारखाच लागू होतो का? प्रत्येक व्यक्तीने रोज तेवढंच पाणी प्यायला हवं का?

याच प्रश्नाचं उत्तर अनेकांना आश्चर्यचकित करणारं आहे. कारण प्रत्येकाच्या शरीराला लागणाऱ्या पाण्याचं प्रमाण एकसारखं नसतं. उलट ते व्यक्तीचं वजन, वय, हवामान, आरोग्याची स्थिती आणि दैनंदिन शारीरिक हालचाली यावर अवलंबून असतं.

ऑस्ट्रेलियन नॅशनल हेल्थ अँड मेडिकल रिसर्च कौन्सिलच्या संशोधनानुसार, शरीराला किती पाणी आवश्यक आहे हे ठरवताना सर्वात महत्त्वाचा निकष म्हणजे शरीराचं वजन. योग्य प्रमाणात पाणी प्यायल्यास शरीरातील पाण्याचं संतुलन राखलं जातं, शरीरातील विविध अवयव सुरळीत कार्य करतात आणि अनेक आरोग्य समस्यांचा धोका कमी होण्यास मदत मिळू शकते.

मग नेमकं आपल्या वजनानुसार किती पाणी प्यायला हवं? यासाठी तज्ज्ञांनी एक अतिशय सोपा फॉर्म्युला सांगितला आहे.

वजनानुसार किती पाणी प्यायला हवं?

नोएडा येथील यथार्थ हॉस्पिटलच्या आहारतज्ज्ञ रिचा शर्मा यांच्या मते, साधारणपणे प्रति किलो वजनामागे ३० ते ३५ मिलिलीटर पाणी पिण्याची गरज असते. म्हणजेच ज्या व्यक्तीचं वजन जास्त असेल, त्या व्यक्तीला तुलनेने अधिक पाण्याची आवश्यकता असू शकते.

हा सोपा फॉर्म्युला लक्षात ठेवा

पाणी (लिटर) = शरीराचं वजन (किलो) × ०.०३ ते ०.०३५

उदाहरण पाहा

५० किलो वजन – सुमारे १.५ ते १.८ लिटर पाणी
६० किलो वजन – सुमारे १.८ ते २.१ लिटर पाणी
७० किलो वजन – सुमारे २.१ ते २.५ लिटर पाणी
याशिवाय, ज्यांना जास्त घाम येतो, जे नियमित व्यायाम करतात, उन्हात काम करतात किंवा शारीरिक मेहनतीचं काम करतात, अशा व्यक्तींना अधिक पाणी पिण्याची गरज भासू शकते.

मग प्रत्येकाने २ ते ३ लिटर पाणी पिणं गरजेचं नाही?

याचं उत्तर आहारतज्ज्ञ स्पष्टपणे नाही असं देतात. उदाहरणार्थ, ४५ ते ५० किलो वजनाची आणि दिवसभर कार्यालयात बसून काम करणारी व्यक्ती आणि ८० ते ९० किलो वजनाची तसेच दिवसभर मेहनत करणारी व्यक्ती, या दोघांच्या शरीराला लागणाऱ्या पाण्याचं प्रमाण सारखं असू शकत नाही, म्हणूनच प्रत्येकाने एकाच प्रमाणात पाणी पिण्याऐवजी आपल्या शरीराच्या गरजेनुसार पाण्याचं प्रमाण ठरवणं अधिक योग्य ठरतं.

पाणी पिताना या गोष्टी लक्षात ठेवा

  • सकाळी उठल्यानंतर १ ते २ ग्लास साधं किंवा कोमट पाणी प्या.
  • एकाच वेळी खूप पाणी पिण्याऐवजी दिवसभर थोडं-थोडं पाणी प्या.
  • जेवणाच्या सुमारे अर्धा तास आधी पाणी पिणं फायदेशीर ठरू शकतं.
  • जेवताना वारंवार पाणी पिणं टाळा. गरज असल्यास १ ते २ घोट पुरेसे आहेत.
  • व्यायाम किंवा चालण्यापूर्वी, दरम्यान आणि नंतर योग्य प्रमाणात पाणी प्या.
  • उन्हाळ्यात जास्त घाम येत असल्यास पाण्यासोबत नारळपाणी किंवा इतर नैसर्गिक द्रवपदार्थांचाही समावेश करू शकता.

तज्ज्ञांचा महत्त्वाचा सल्ला

दररोज सर्वांनीच २ किंवा ३ लिटर पाणी पिणं आवश्यक आहे, हा समज पूर्णपणे योग्य नाही. प्रत्येक व्यक्तीच्या शरीराची गरज वेगळी असते, त्यामुळे आपल्या वजनानुसार, दैनंदिन हालचाली आणि आरोग्याच्या स्थितीनुसार पाण्याचं प्रमाण ठरवणं अधिक योग्य ठरतं.

सूचना : ही माहिती सर्वसाधारण आरोग्यविषयक माहितीसाठी आहे. कोणताही आरोग्यविषयक निर्णय घेण्यापूर्वी किंवा तुमच्यासाठी नेमकं किती पाणी योग्य आहे, हे जाणून घेण्यासाठी डॉक्टर किंवा आहारतज्ज्ञांचा सल्ला घ्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button