
कॅनमधून पेट्रोल-डिझेल बंदीचा फटका, ऐन खरीप हंगामात शेतकरी अडचणीत
सरकारच्या नव्या आदेशामुळे ऐन खरीप हंगामात शेतकर्यांसमोर डिझेल आणि पेट्रोल उपलब्धतेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. दि. ११ जून रोजी जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार पेट्रोल पंपांवर बॅरल, कॅन किंवा बाटल्यांमध्ये पेट्रोल व डिझेल देण्यास बंदी घालण्यात आली आहे. या निर्णयाचा सर्वाधिक फटका कृषी क्षेत्राला बसत असून, शेतीची कामे खोळंबण्याची भीती लांजा तालुक्यातील शेतकर्यांनी व्यक्त केली आहे.
सध्या पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नांगरणी, वखरणी, पेरणीपूर्व मशागत तसेच अन्य कृषी कामांना वेग आला आहे. या काळात ट्रॅक्टर, रोटरी टिलर, ग्रासकटर, फवारणी पंप आणि अन्य कृषी यंत्रे दिवसभर शेतातच कार्यरत असतात. अशा यंत्रांना इंधन भरण्यासाठी प्रत्येक वेळी पेट्रोल पंपावर नेणे व्यवहार्य नसल्याने शेतकरी कॅन किंवा बॅरलमध्ये पेट्रोल-डिझेल आणून यंत्रांमध्ये भरत असतात. मात्र नव्या निर्बंधामुळे अनेक पेट्रोल पंपांनी अशा प्रकारे इंधन देणे बंद केले आहे. यामुळे कृषी यंत्रे पंपापर्यंत नेण्यासाठी अतिरिक्त वेळ, इंधन आणि वाहतूक खर्च करावा लागत आहे. परिणामी, आधीच वाढलेल्या उत्पादन खर्चात आणखी भर पडत असून शेतकर्यांचे आर्थिक गणित विस्कळीत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
www.konkantoday.com




