
30 जूननंतर 10, 20, 50, 100 च्या नोटा बंद होण्याचे वृत्त चुकीचे! बँक ऑफ महाराष्ट्राचा अत्यंत महत्त्वाचा खुलासा
2005 पूर्वी छापण्यात आलेल्या महात्मा गांधी मालिकेतील 10, 20, 50 आणि 100 च्या नोटा 30 जूननंतर बंद होणार का, असा प्रश्न अलीकडे सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका वृत्तामुळे उपस्थित झाला होता.एका मीडिया रिपोर्टमध्ये बँक ऑफ महाराष्ट्रच्या कथित परिपत्रकाचा हवाला देत, 30 जूननंतर अशा नोटा स्वीकारल्या जाणार नाहीत, असा दावा करण्यात आला होता. या वृत्तामुळे पुन्हा एकदा नोटाबंदी होणार असल्याच्या चर्चांना उधाण आले.
नेमका काय दावा करण्यात आला होता?
व्हायरल झालेल्या मीडिया रिपोर्टमध्ये असा दावा करण्यात आला होता की, बँक ऑफ महाराष्ट्रने 2005 पूर्वी छापलेल्या 10, 20, 50 आणि 100 च्या नोटा 30 जूननंतर स्वीकारू नयेत, असे आदेश जारी केले आहेत. तसेच पुढील काळात इतर बँकाही अशाच प्रकारचे निर्णय घेऊ शकतात, असेही त्यात म्हटले होते. मात्र बँकेने स्वतःच या दाव्याचे खंडन केल्यामुळे या सर्व चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.
याशिवाय भारतीय रिझर्व्ह बँकेकडून (RBI) अशा प्रकारचा कोणताही आदेश जारी करण्यात आलेला नाही. त्यामुळे जुन्या नोटांबाबत कोणताही संभ्रम बाळगण्याचे कारण नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
बँक ऑफ महाराष्ट्रने आपल्या अधिकृत फेसबुक पेजवर प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, बँक ऑफ महाराष्ट्रच्या शाखांमध्ये 2005 पूर्वी छापलेल्या 10, 20, 50 आणि 100 च्या नोटा 30 जूननंतर स्वीकारल्या जाणार नाहीत, असा एक चुकीचा संदेश सोशल मीडियावर व्हायरल केला जात आहे. बँकेचे स्पष्ट म्हणणे आहे की, ही बातमी पूर्णपणे खोटी आणि दिशाभूल करणारी आहे. ग्राहकांनी अशा कोणत्याही संदेशांवर विश्वास ठेवू नये. तसेच असे संदेश पुढे पाठवू नयेत. कोणतीही अधिकृत माहिती केवळ अधिकृत स्रोतांवरूनच घ्यावी.




