
रत्नागिरी शहरातील मारुती मंदिर परिसरातील लॉजवर तरुणाची आत्महत्या
रत्नागिरी शहरातील मारुती मंदिर परिसरातील लॉजमध्ये एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आकाश दिलीप लोखंडे (वय ३४, रा. नवरेनगर, अंबरनाथ, ठाणे) असे मयत तरुणाचे नाव आहे.
याप्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. आकाश लोखंडे हे आपल्या खासगी कामासाठी रत्नागिरीत आले होते. ते मारुती मंदिर परिसरात असलेल्या लॉजमध्ये वास्तव्यास होते. दि. २३ जून रोजी सायंकाळी ७:३५ वाजण्याच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. लॉजमधील रूमच्या बाथरुममध्ये आकाश यांनी बेडशीटचा तुकडा वापरून गळफास घेतल्याचे आढळून आले.
तरुण बेशुद्धावस्थेत आढळल्यानंतर त्यांना तातडीने खासगी ऍम्ब्युलन्सद्वारे जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तपासणीअंती वैद्यकीय अधिकार्यांनी आकाश लोखंडे यांना सायंकाळी ७:३५ च्या पूर्वीच मृत घोषित केले. आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पुढील तपास रत्नागिरी पोलीस करीत आहेत.www.konkantoday.com




