
आयुष्मान योजनेत पारदर्शकता वाढविण्याची आमदार शेखर निकम यांची विधानसभेत मागणी
मुंबई : आयुष्मान भारत व महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेचा लाभ सर्वसामान्य, गरीब आणि गरजू नागरिकांना अधिक प्रभावी व पारदर्शक पद्धतीने मिळावा, यासाठी आमदार शेखर निकम यांनी पावसाळी अधिवेशनात विधानसभेत महत्त्वाचा प्रश्न उपस्थित केला.
योजनेअंतर्गत काही रुग्णालयांमध्ये उपचार खर्चाबाबतची संपूर्ण माहिती लाभार्थ्यांना उपलब्ध होत नसल्याचे निदर्शनास आणून देत त्यांनी शासनाचे लक्ष वेधले. लाभार्थ्यांच्या हिताचे संरक्षण करण्यासाठी आरोग्य योजनांच्या अंमलबजावणीत अधिक पारदर्शकता व उत्तरदायित्व आवश्यक असल्याचे त्यांनी सभागृहात स्पष्ट केले.
प्रत्येक उपचारानंतर संबंधित रुग्णाला मंजूर पॅकेज, झालेला खर्च आणि उर्वरित रकमेचा तपशील लेखी स्वरूपात देण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली. तसेच योजनांचे नियमित लेखापरीक्षण करण्यात यावे, तक्रार निवारण यंत्रणा अधिक सक्षम करावी आणि लाभार्थ्यांच्या कार्डावरील वापरलेली व शिल्लक रक्कम तात्काळ कळविण्याची प्रभावी व्यवस्था उभारावी, अशा सूचनाही त्यांनी शासनाला केल्या.
गरीब व गरजू नागरिकांच्या आरोग्य हक्कांचे संरक्षण करण्यासोबतच शासनाच्या महत्त्वाकांक्षी आरोग्य योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत पारदर्शक आणि परिणामकारक पद्धतीने पोहोचणे आवश्यक असल्याचे आमदार निकम यांनी नमूद केले.
आरोग्य योजनांमधील पारदर्शकता, जबाबदारी आणि नागरिकांचा विश्वास अधिक दृढ करण्यासाठी करण्यात आलेली ही मागणी सभागृहात विशेष लक्षवेधी ठरली.




