
रत्नागिरी जिल्ह्यात २८ जून रोजी पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचे आयोजन
रत्नागिरी जिल्ह्यातील ० ते ५ वर्षे वयोगटातील सर्व बालकांना पोलिओपासून संरक्षण मिळावे यासाठी पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. या मोहिमेअंतर्गत जिल्ह्यातील ० ते ५ वर्षे वयोगटातील सर्व पात्र बालकांना रविवारी (२८ जून) रोजी पोलिओ प्रतिबंधक लसीचे दोन थेंब देण्यात येणार आहेत.
पोलिओ हा बालकांमध्ये कायमस्वरूपी अपंगत्व निर्माण करणारा गंभीर आजार असून, त्याच्या प्रतिबंधासाठी नियमित लसीकरणाबरोबरच पल्स पोलिओ मोहिमेतील सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे. जिल्ह्यातील शासकीय आरोग्य संस्था, प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे,शाळा तसेच विविध सार्वजनिक ठिकाणी पोलिओ लसीकरण बूथ उभारण्यात आले आहेत. याशिवाय दुर्गम भागातील व वंचित राहिलेल्या बालकांपर्यंत पोहोचण्यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांकडून घरभेटीद्वारे लसीकरण करण्यात येणार आहे. जिल्हा परिषद अध्यक्षा अस्मिता केंद्रे, उपाध्यक्ष विलास चाळके, मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे , जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात येत आहे.
या मोहिमेअंतर्गत जिल्ह्यातील ० ते ५ वर्षे वयोगटातील ५८,८१५ लाभार्थी असून १६५९ पोलिओ बूथवर ३४७७ आरोग्य कर्मचारी काम करणार आहेत. ३४६ पर्यवेक्षक पोलिओ बूथला भेटी देऊन पर्यवेक्षण करणार आहेत,अशी माहिती जिल्हा मत बालसंगोपन अधिकारी डॉ. माधव ठाकूर यांनी दिली आहे.
जिल्हा परिषद अध्यक्षा श्रीमती अस्मिता केंद्रे यांनी सर्व पालकांना आपल्या ० ते ५ वर्षे वयोगटातील बालकांना पोलिओ प्रतिबंधक लसीचे दोन थेंब पाजून या राष्ट्रीय मोहिमेत सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले आहे. जिल्हा परिषद उपाध्यक्ष श्री विलास चाळके यांनीही प्रत्येक बालकापर्यंत लसीकरण सेवा पोहोचविण्यासाठी आरोग्य विभाग कटिबद्ध असल्याचे सांगितले व जनतेने पोलिओ मोहिमेस सहकार्य करून मोहीम यशस्वी करण्याचे आवाहन केले आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे यांनी जिल्ह्यातील सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करून मोहिम शंभर टक्के यशस्वी करण्याचे निर्देश दिले आहेत.तसेच पोलिओमुक्त भारताचे उद्दिष्ट कायम राखण्यासाठी प्रत्येक पालकाने आपल्या बालकाला पोलिओचे दोन थेंब अवश्य द्यावेत, असे आवाहन त्यांनी केले आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व पालकांनी आपल्या ० ते ५ वर्षे वयोगटातील बालकांना पल्स पोलिओ लसीकरणाचा लाभ देऊन पोलिओमुक्त समाज घडविण्यास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांनी केले आहे.




