
धावत्या लोकल ट्रेनमध्ये भोसकलं, तरुणाचा जागीच मृत्यू, हल्लेखोर CCTV कॅमेऱ्यात कैद
मुंबईची जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या लोकल ट्रेनमध्ये मंगळवारी रात्री उशिरा एक थरकाप उडवणारा प्रकार घडला आहे. रेल्वेतून प्रवास करत असताना धावत्या गाडीत एका तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे.आरोपीनं धारदार चाकुने वार करून ही हत्या केली आहे. हत्येचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. ही घटना उघडकीस येताच पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आरोपीची ओळख पटली असून त्याचा शोध घेतला जात आहे.
नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री सुमारे १० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावासामुळे लोकलचा दरवाजा बंद करण्यावरून दोन प्रवाशांमध्ये जोरदार वाद सुरू झाला. हा वाद इतका टोकाला गेला की, डब्यातील काही प्रवाशांनी मिळून आरोपीला मारहाण केली. या मारहाणीमुळे संतप्त झालेल्या आरोपीने तातडीने आपल्या बॅगेतून चाकू काढला आणि मयांक लोहार नावाच्या प्रवाशावर सपासप वार केले.
हा हल्ला इतका भयंकर होता की ज्यात मयांक लोहार हा रक्ताच्या थारोळ्यात पडला. ऐन गर्दीत त्याच्यावर हा हल्ला झाला होता. मात्र मयांकला वाचवण्यासाठी कुणीच पुढे सरसावलं नाही. बराच वेळ तो रक्ताच्या थारोळ्यात लोकलमध्ये पडला होता. या प्रकारानंतर मयांक लोहार यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले, मात्र दुर्दैवाने त्यांचा मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच पश्चिम रेल्वे पोलिसांनी (WR Police) घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीची ओळख पटली असून तो सध्या फरार आहे. त्याचा माग काढण्यासाठी आणि त्याला तात्काळ अटक करण्यासाठी रेल्वे पोलिसांची ६ विशेष पथके तैनात करण्यात आली आहेत. पश्चिम रेल्वे पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत




