एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ५ टक्क्यांनी वाढ, प्रताप सरनाईकांची विधानसभेत मोठी घोषणा!


राज्य परिवहन (एसटी) महामंडळ कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे. परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रतापराव सरनाईक यांनी महागाई भत्ता राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे ५३ टक्क्यांवरून ५८ टक्क्यांपर्यंत वाढविण्याची घोषणा आज विधानसभेत केली. तसेच कर्मचाऱ्यांच्या घरभाडे भत्त्यातही वाढ जाहीर केली आहे.

महायुती सरकारने घेतला ऐतिहासिक निर्णय

“काल मी एसटी महामंडळाच्या सर्व युनियनची बैठक घेतली. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात सेवा देणाऱ्या एसटीच्या ८६ हजार कर्मचाऱ्यांच्या न्यायहक्काला दाद द्यायला हवी. एसटी ही केवळ परिवहन संस्था नाही, ती महाराष्ट्राच्या सर्वसामान्य जनतेची जीवनवाहिनी आहे. गेली ८ दशके शेतकरी, विद्यार्थी, कामगार, महिला व ज्येष्ठ नागरीक, आदिवासी आणि दुर्गम भागातील लाखो नागरिकांना जोडून ठेवलं आहे. या लालपरीचा खरा आधारस्तंभ म्हणजे एसटीचे कर्मचारी. उन्हाळा, पावसाळा असो वा इतर काहीही असो, या कर्मचाऱ्यांचे योगदान शब्दांत मांडणं कठीण आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्या महायुती सरकारने एसटी कर्मचाऱ्यांच्या भावना समजून घेत ऐतिहासिक निर्णय घेतला आहे”, असं म्हणत प्रताप सरनाईक यांनी वेतनवाढीचा निर्णय जाहीर केला.

महागाई भत्त्यात ५ टक्क्यांनी वाढ

ते म्हणाले, “राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ५३ टक्क्यांवरून ५८ टक्के करण्यात आला आहे. त्याचबरोबर घरभाडे भत्ता ८-१६-२४ टक्क्यांवरून वरून १०-२० आणि ३० टक्के वार्षिक वेतन वाढीचा दर २ टक्क्यांवरून ३ टक्के करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. हा ऐतिहासिक निर्णय जाहीर करतोय याचा अभिमान आहे. महाविकास आघाडीच्या कार्यकाळात कधी नव्हे तो एसटीचा संप भरकटला होता. आज एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलनाची हाक दिलेली असताना आंदोलनापूर्वीच आम्ही त्यांना वेतनवाढ केली आहे.”

“कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता, घरभाडे भत्ता आणि वार्षिक वेतनवाढीचा थकबाकी वैधानिक देणी मिळून सुमारे ५ हजार ६४९ कोटी रुपये अदा करण्यास शासन कटिबद्ध आहे”, असंही ते म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button