
बेस्टचा संप अखेर मागे; उपमुख्यमंत्र्यांबरोबर झालेल्या बैठकीत वेतनवाढीला मान्यता!
मुंबई : गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या बेस्ट कर्मचार्यांचा संप रविवारी रात्री उशिरा मागे घेण्यात आला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याबरोबर कृती समितीची बैठक झाली. बैठकीत कायमस्वरूपी कर्मचार्यांना तीन हजार, तर कंत्राटी कर्मचार्यांना दोन हजार रुपयांच्या हंगामी वेतनवाढीची घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली, तसेच निवृत्त कर्मचार्यांनी थकीत देणी या आर्थिक वर्षात अदा करण्यात येणार असून येत्या तीन वर्षांत पाच हजार बस बेस्टच्या ताफ्यात सामील करून घेण्यात येणार आहे.
तसेच येत्या १५ दिवसांत इतर विषयांबाबत चर्चा करण्यात येणार आहे. बेस्टचा संप मिटल्याने मुंबईकरांना दिलासा मिळणार आहे. सह्याद्री अतिथीगृह येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीस परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, आमदार सचिन अहिर, आमदार मुरजी पटेल, उपमुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव असीम गुप्ता, प्रधान सचिव नवीन सोना, मुंबई महापालिका आयुक्त अश्विनी भिडे, बेस्टच्या महाव्यवस्थापक सोनिया सेठी, तसेच बेस्ट कर्मचारी कृती समितीचे पदाधिकारी उपस्थित होते. बेस्ट बस सेवा तात्काळ सुरू करण्याचे निर्देशही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिले.
कर्मचार्यांची प्रलंबित ग्रॅच्युईटीची रक्कम याच आर्थिक वर्षात अदा करण्यात यावी, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी पुढील तीन वर्षांत ५००० नवीन बस स्वत:च्या मालकीच्या घेण्यात येणार असून, त्यासाठी आवश्यक आर्थिक तरतूद नियोजित पद्धतीने करण्याचे निर्देश यावेळी दिले. याशिवाय नवीन वेतन करार होईपर्यंत अंतरिम दिलासा म्हणून बेस्टच्या कर्मचार्यांना ३ हजार आणि कंत्राटी कर्मचार्यांना २ हजार रुपये मासिक हंगामी वाढ देण्याचे मान्य करण्यात आले आहे. बेस्ट प्रशासनाने तयार केलेला ‘कायापालट’ प्रस्ताव तातडीने शासनास सादर करून त्यास मंत्रिमंडळाची मान्यता घेतली जाईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिली.
प्रवाशांचे हाल
- शुक्रवारी सुरू झालेल्या संपाचा रविवार तिसरा दिवस होता. तीन दिवस वेगवेगळ्या स्तरावर बेस्ट कृती समिती बरोबर चर्चा बैठका पार पडल्या. मात्र संपावर काहीच तोडगा निघाला नव्हता.
- रविवारी दिवसभर २२ बस आगारातून भाडेतत्त्वावरील व बेस्टच्या स्वमालकीची एकही बस रस्त्यावर धावली नव्हती. रविवार असल्याने मुंबईतील बहुतांश कार्यालयांना सुट्टी असल्याने दक्षिण मुंबईत येणार्यांची संख्या कमी असते. ‘मात्र रविवार सुट्टीचा दिवस पर्यटक मोठ्या प्रमाणावर गेट वे ऑफ इंडिया, नरिमन पॉइंट, गिरगाव चौपाटी, मरीन ड्राइव्ह याठिकाणी फिरण्यासाठी येत असतात. मात्र बेस्ट बस रस्त्यावरून गायब असल्याने प्रवाशांना हाल सहन करावे लागले.




