
वसई-विरारमध्ये मेघगर्जनेसह जोरदार पाऊस; उकाड्याने त्रस्त नागरिकांना आणि बळीराजाला मोठा दिलासा!
गेल्या काही दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने अखेर सोमवारी सकाळी वसई-विरार परिसरात जोरदार हजेरी लावली. सकाळी ७ वाजल्यापासूनच मेघगर्जनेसह मुसळधार पावसाला सुरुवात झाली. या पहिल्याच मोठ्या पावसामुळे गेले कित्येक दिवस असह्य उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांना प्रचंड दिलासा मिळाला आहे. तर दुसरीकडे, पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या बळीराजाच्या चेहऱ्यावरही समाधान पाहायला मिळत आहे.
चालू वर्षी जून महिना अर्धा उलटून गेला, तरीही पावसाने म्हणावी तशी हजेरी लावली नव्हती. त्यामुळे यंदा दुष्काळाचे सावट निर्माण होईल की काय, अशी भीती नागरिकांसह शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली होती. धरणांमधील पाणीसाठा आणि शेतीच्या कामांबद्दल चिंता व्यक्त केली जात होती. मात्र, आज झालेल्या दमदार पावसामुळे ही भीती तूर्तास दूर झाली असून संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण आहे.
सोमवार हा आठवड्याचा पहिलाच दिवस असल्याने आणि सकाळी ७ वाजल्यापासूनच पावसाने जोरदार सुरुवात केल्यामुळे कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांची चांगलीच तारांबळ उडाली. अचानक आलेल्या पावसामुळे बस स्थानके, रेल्वे स्थानके आणि रस्त्यांवर नागरिकांची छत्री आणि रेनकोट शोधण्यासाठी पळापळ सुरू असलेली पाहायला मिळाली. काही सखल भागांत किरकोळ पाणी साचल्याने वाहतुकीचा वेग मंदावला होता.




