
उद्योगही चालू राहतील आणि नागरिकांनाही पाणी मिळेल’-पाणीटंचाई वरून उद्योगमंत्र्यांचा विरोधकांना टोला
*रत्नागिरी, जिल्ह्यातील पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर उद्योगमंत्री तथा पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी विरोधकांवर टीका करत, पाण्याअभावी उद्योगधंदे बंद पडतील असे वातावरण मुद्दाम निर्माण केले जात असल्याचा आरोप केला. पाऊस पडला नाही याला उद्योगमंत्री जबाबदार आहेत का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
मानवी जीवनाला प्राधान्य देणे ही शासनाची भूमिका असल्याचे सांगताना सामंत म्हणाले की, राज्यभरातील एमआयडीसी क्षेत्रांमध्ये निवासी भागाला पाणीटंचाई जाणवू नये यासाठी आवश्यक तेवढा पाणीपुरवठा केला जाईल. तसेच उद्योगधंदेही बंद पडणार नाहीत, याची काळजी घेतली जाईल. कोयना धरणातील काही पाणी उपलब्ध करून देता येते का, यासाठी जलसंपदा मंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
राजकीय घडामोडींवर बोलताना सामंत यांनी ‘ऑपरेशन टायगर’वर भाष्य केले. पक्षप्रवेशांना ‘ऑपरेशन टायगर’ म्हणायचे असेल तर ते वर्षभर सुरूच असते, असे ते म्हणाले. रत्नागिरी जिल्ह्यासह राज्यभरातून अनेक नेते आणि कार्यकर्ते सत्ताधारी पक्षांच्या संपर्कात असल्याचा दावा त्यांनी केला.
उद्धव ठाकरे यांच्या अलीकडील वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना सामंत म्हणाले की, शिवसेनेला सर्वाधिक धक्का काँग्रेसमुळे बसला होता. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा मतदानाचा हक्क हिरावून घेण्यापासून शिवसेना फोडण्यापर्यंत काँग्रेसची भूमिका होती, असा आरोप त्यांनी केला. सावरकरांवर टीका करणाऱ्या काँग्रेससोबत उद्धव ठाकरे असल्याने उर्वरित शिवसेना काँग्रेसमध्ये विलीन होण्याच्या दिशेने जात आहे, असा दावा त्यांनी केला.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आवाहनाबाबत बोलताना, त्यांनी दिलेल्या सल्ल्याला मतदार किती प्रतिसाद देतात हे आगामी निवडणुकांमध्ये स्पष्ट होईल, असे सामंत म्हणाले.
युबीटी नेते भास्कर जाधव यांच्या भूमिकेचा उल्लेख करताना सामंत यांनी सांगितले की, त्यांनी मांडलेले मुद्दे महत्त्वाचे आहेत. पक्षांतर्गत संवाद कमी झाल्यामुळे अडचणी निर्माण होत असून काळानुसार बदल आणि कार्यकर्त्यांशी सातत्याने संवाद आवश्यक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. भास्कर जाधव यांच्या सूचनांची अंमलबजावणी झाली तर उर्वरित शिवसेना टिकून राहू शकते, असेही ते म्हणाले.




