
पाणीटंचाईची चाहूल; चिपळूणसाठी कोयना धरणातून पाणी सोडण्याची मागणी
नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांची कोयनानगर व फोफळी येथे वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा; नागरिकांना पाणी बचतीचे आवाहन
चिपळूण/ : जून महिना संपत आला तरी समाधानकारक पाऊस न झाल्याने चिपळूण शहर व तालुक्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. जलस्रोतांतील पाणीसाठा झपाट्याने कमी होत असल्याने भविष्यात उद्भवू शकणारी पाणीटंचाई टाळण्यासाठी चिपळूण नगर परिषदेचे नगराध्यक्ष उमेश धोंडीराम सकपाळ यांनी कोयनानगर व फोफळी येथे जाऊन संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेत चिपळूणसाठी आवश्यक प्रमाणात पाणी उपलब्ध करून देण्याची मागणी केली.
नगराध्यक्ष सकपाळ यांनी कोयना सिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. रासणकर तसेच महाजनको, फोफळीचे मुख्य अभियंता श्री. कुंभार यांच्याशी चर्चा करून चिपळूण शहर व तालुक्यातील पिण्याच्या पाण्याच्या सद्यस्थितीची माहिती दिली. कोयना धरणातून आवश्यक प्रमाणात पाणी सोडल्यास वाशिष्ठी नदीतील पाण्याची पातळी कायम राहून नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत होईल, असे त्यांनी सांगितले.
या भेटीवेळी बांधकाम सभापती कपिल शिर्के, नगरसेवक उदय जुवळे, नगरसेवक प्रमोद बुरटे, शिवसेना उपशहरप्रमुख सुयोग चव्हाण तसेच पाणी विभागाचे अधिकारी श्री. खाडे उपस्थित होते.
दरम्यान, नगराध्यक्ष सकपाळ यांनी नागरिकांना पाण्याचा जपून वापर करण्याचे आवाहन केले आहे. घरातील नळ, पाईप व पाण्याच्या टाक्यांमधील गळती तातडीने दुरुस्त करावी, टाक्या भरल्यानंतर पाणी ओसंडून वाहणार नाही याची दक्षता घ्यावी तसेच वाहन धुणे, अंगण धुणे किंवा इतर अनावश्यक कामांसाठी पिण्याच्या पाण्याचा वापर टाळावा, असे त्यांनी म्हटले आहे.
नागरिकांनी आवश्यक तेवढेच पाणी वापरून अपव्यय टाळावा तसेच सार्वजनिक ठिकाणी पाणीगळती आढळल्यास त्वरित नगर परिषदेला माहिती द्यावी, असे आवाहनही त्यांनी केले. पाणी ही अमूल्य नैसर्गिक संपत्ती असून आजची पाण्याची बचत भविष्यातील संकटावर मात करण्यासाठी महत्त्वाची ठरणार असल्याचे त्यांनी नमूद केले.
चिपळूण शहर व तालुक्यातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याची कोणतीही अडचण निर्माण होऊ नये यासाठी नगर परिषद प्रशासन संबंधित विभागांशी सातत्याने पाठपुरावा करत असून आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात येत असल्याचे नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांनी स्पष्ट केले.
ji




