रत्नागिरीत ‘युवा क्रांती सेना’ या नव्या राजकीय पक्षाची स्थापना; स्थानिकांच्या प्रश्नांसाठी जनआंदोलन उभारण्याची घोषणा


रत्नागिरी शहरात ‘युवा क्रांती सेना’ या नव्या राजकीय पक्षाची अधिकृत स्थापना जाहीर करण्यात आली.

पक्षाचे संयोजक जुनेद मज्जिद बंदरकर यांनी या नव्या पक्षाची अधिकृत भूमिका आणि जाहीर निवेदन सादर केले. कोकणची अस्मिता, स्थानिकांचे हक्क, रोजगार, निसर्ग संरक्षण आणि युवकांच्या भविष्यासाठी उभे राहिलेले हे एक जनआंदोलन असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

छ. शिवाजी महाराज, छ. संभाजी महाराज आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारांवर आधारित हा पक्ष काम करणार असून यामध्ये कोणत्याही प्रकारची हाय-कमांड संस्कृती नसेल आणि सर्व निर्णय प्रक्रिया स्थानिक कार्यकर्त्यांच्या सहभागातून होईल, असा दावा करण्यात आला आहे.

यापूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत दक्षिण रत्नागिरी जिल्ह्यात विविध पदांवर काम केलेल्या या पदाधिकाऱ्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी का दिली, याचे कारणही यावेळी स्पष्ट केले. स्थानिक पातळीवरील प्रश्नांवर तातडीने निर्णय घेण्याची गरज असताना प्रत्येक गोष्टीसाठी वरिष्ठांच्या परवानगीची वाट पाहावी लागत होती.

तसेच मुंबईतील वातानुकूलित कार्यालयात बसून कोकणातील शेतकरी, मच्छीमार आणि युवकांचे प्रश्न सुटू शकत नाहीत, या वास्तवाची जाणीव झाल्याने मनसेच्या सदस्यत्वाचा राजीनामा देऊन सामूहिक निर्णयाने नव्या पक्षाची स्थापना केल्याचे बंदरकर यांनी सांगितले.

सत्तेसाठी नव्हे तर विकासासाठी राजकारण करण्याच्या उद्देशाने आगामी ग्रामपंचायत निवडणुकांवर पक्षाने लक्ष केंद्रित केले आहे. गावाचा विकास झाल्याशिवाय जिल्ह्याचा विकास शक्य नसल्याची भूमिका पक्षाने घेतली असून स्थानिक ग्रामस्थांच्या मतांचा आदर करून आगामी निवडणुका लढवल्या जाणार आहेत.

कोकणातील आरोग्य व्यवस्थेचे विदारक वास्तव मांडताना प्रत्येक तालुक्यात सुसज्ज आणि बहुविशेषज्ञ रुग्णालये उभारण्यासाठी पक्ष लढा उभारणार असल्याचे सांगण्यात आले. आजही गंभीर उपचारांसाठी स्थानिकांना मुंबई, पुणे किंवा गोव्यावर अवलंबून राहावे लागते, ही परिस्थिती बदलण्याचा पक्षाचा प्रयत्न राहील.

यासोबतच परप्रांतीय भू-माफियांकडून होणारी जमिनींची लूट रोखणे, विनाशकारी प्रकल्पांना कडाडून विरोध करणे, हापूस आंबा आणि काजू उत्पादकांना संरक्षण देणे, तसेच मत्स्यव्यवसाय व पर्यटनाला चालना देऊन स्थानिक तरुणांना रोजगारात प्राधान्य देण्याचा संकल्प युवा क्रांती सेनेने व्यक्त केला आहे.

नद्या, समुद्रकिनारे आणि जैवविविधतेचे रक्षण करत पर्यावरणपूरक औद्योगिक विकासासाठी पक्ष यापुढे सक्रिय राहणार असल्याचे या पत्रकार परिषदेत स्पष्ट करण्यात आले.

यावेळी सचिन शिंदे, शकील गवाणकर आणि पदाधिकारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button