
खेड तालुक्यातील रजवेल मोहल्ला येथे भीषण आग; २५ जनावरांचा होरपळून मृत्यू
खेड तालुक्यातील रजवेल मोहल्ला येथे गुरुवारी (१८ जून) पहाटे लागलेल्या भीषण आगीत गुरांच्या गोठ्याचे मोठे नुकसान झाले. या दुर्घटनेत १७ म्हशी, १ गाय आणि ७ वासरे अशा एकूण २५ जनावरांचा होरपळून मृत्यू झाला असून दोन म्हशींना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले.
पहाटे सुमारे ५.१० वाजण्याच्या सुमारास गोठ्याला अचानक आग लागली. आग वेगाने पसरल्याने गोठ्यातील जनावरे अडकून पडली. घटनेची माहिती मिळताच खेड नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले.
अग्निशमन विभागातील फायरमन श्याम देवळेकर, दीपक देवळेकर, वाहनचालक गजानन जाधव तसेच सहायक फायरमन जयेश पवार, प्रणय रसाळ आणि प्रणव घाग यांनी अथक प्रयत्न करत आग नियंत्रणात आणली. मात्र, तोपर्यंत २५ जनावरांचा मृत्यू झाला होता.
या आगीत पशुपालकाचे लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून संबंधित यंत्रणांकडून तपास सुरू आहे.
या दुर्दैवी घटनेमुळे रजवेल परिसरात शोककळा पसरली असून पशुपालक कुटुंबावर मोठे संकट ओढवले आहे. ग्रामस्थांकडून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.




