
गुहागर-विजापूर राष्ट्रीय महामार्गावर कार-दुचाकी अपघातात ४७ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू
गुहागर-विजापूर राष्ट्रीय महामार्गावर गुहागर दिवाणी न्यायालयासमोर रविवारी सायंकाळी झालेल्या कार आणि दुचाकीच्या अपघातात ४७ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. या घटनेमुळे गुहागर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
संजय वसंत कानसरे (वय ४७, रा. वरचापाट, सांगळेवाडी, गुहागर) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव असून ते परिसरातील प्रसिद्ध पेंटर म्हणून परिचित होते.
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी सायंकाळी सुमारे ६.४५ वाजता संजय कानसरे हे मोडकाघर येथून दुचाकीवरून गुहागरच्या दिशेने येत होते. त्याचवेळी गुहागरकडून शृंगारतळीच्या दिशेने जाणाऱ्या मारुती इको कारशी त्यांच्या दुचाकीची जोरदार धडक झाली. या अपघातात कानसरे गंभीर जखमी झाले.
अपघातानंतर त्यांना तातडीने उपचारासाठी कामथे येथील रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केले.




