समृद्धी महामार्गांवर दर ५० किलोमिटरला विश्रांती मार्ग; अपघातांना बसणार आळा, महामार्ग पोलीस अधीक्षक म्हणतात,’ ब्लॅक स्पॉट्सचे.’

नागपूर : हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी द्रुतगती महामार्गावर तीन वर्षांमध्ये १७९ जणांचा अपघाती मृत्यू झाला. यापैकी गेल्यावर्षी २८ प्राणांतिक अपघातांमध्ये ३३ जण दगावले. चालू वर्षात २३ अपघातांमध्ये २५ जणांचा मृत्यू झाला.

या महामार्गावर २०० किलोमिटरपर्यंत विश्रांतीची सोय नाही. त्यामुळे वाहनचालकांच्या सुरक्षेसाठी समृद्धीवर दर ५० किलोमिटरला विश्रांती मार्ग तयार केला जात आहे. लवकरच त्याची अंमलबजावणी होईल, अशी माहिती महामार्ग सुरक्षा पोलीस अधीक्षक लोहित मतानी यांनी येथे दिली.

पत्रकारांशी साधलेल्या संवादात मतानी म्हणाले, नागपूर परिक्षेत्रातील महामार्गांवर २०२३ मध्ये ९७१ जणांचा मृत्यू झाला होता. प्रतिबंधात्मक उपाय, ब्लॅक स्पॉट सुधारणा आणि संयुक्त मोहिमांमुळे २०२५ मध्ये हा आकडा ६५७ पर्यंत घसरला. दोन वर्षांत सुमारे ३२ टक्के घट झाली मात्र, चालू वर्षात मृत्यूंची संख्या ३०४ कायम आहे. अतिवेग, मद्य प्राशन, हेल्मेटचा अभाव आणि चुकीच्या ठिकाणी वाहने उभी करणे ही मृत्यूची प्रमुख कारणे आढळली आहेत. येणाऱ्या काळात हे अपघाती मृत्यू १५ टक्के कमी करण्याचे उद्दीष्ट आहे. त्यासाठी पंचसुत्रांवर काम केले जात आहे, असेही मतानी यांनी स्पष्ट केले.

या पाच सुत्रांवर काम

नागपूर शहर पोलिसांच्या धर्तीवर स्वतंत्र ‘अपघात विश्लेषण कक्ष’ सुरू केला आहे. हा कक्ष अपघातांची कारणमीमांसा, ब्लॅक स्पॉट्सचे विश्लेषण, रस्त्यांतील अभियांत्रिकी त्रुटी आणि सुधारणा उपायांचा अभ्यास करणार आहे. ‘ऑपरेशन यू-टर्न’ अंतर्गत मद्यधुंद वाहनचालकांवर विशेष मोहीम, हेल्मेट सक्ती, वेगमर्यादा नियंत्रण, धोकादायक पार्किंगविरोधी कारवाई आणि विविध रस्ता विकास यंत्रणांसाठी एकत्रित डॅशबोर्ड तयार करण्यावर भर आहे.

मृत्यूंजय दूत वाढवणार

महामार्गांवरील अपघातींच्या मदतीसाठी मृत्यूंजय दूर ही संकल्पना राबवली जात आहे. यातून १४ ठिकाणी प्रत्येकी १०० असे १४०० मृत्यूंजय दूत आहेत. प्राणांतिक अपघातांमध्ये मदतीला धावून येणाऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रत्येकी अडिच लाखांचे प्रोत्साहन बक्षिस दिले जाते. शिवाय पंतप्रधान मदत योजनेतून अपघातींच्या उपचारासाठी रुग्णालयांना दिड लाखांची मदत सरकार करते. येणाऱ्या काळात ही संख्या वाढवण्यावर भर असेल, असेही मतानी यांनी स्पष्ट केले.

तीन वर्षांत वाचवले ३१४ जीव

गेल्या तीन वर्षांत महामार्गावरील मृत्यूंच्या संख्येत घट होत आहे. २०२३ मध्ये ९७१ मृत्यूंची नोंद झाली होती. २०२४ मध्ये ही संख्या ७७१ वर आली, म्हणजेच १९.५ टक्के घट झाली. त्यानंतर २०२५ मध्ये मृत्यूंची संख्या आणखी कमी होऊन ६५७ झाली. जी २०२४ च्या तुलनेत यात १४.८ टक्के घट झाली. दरवर्षी सरासरी ३१४ जीव वाचविण्यात यश आले आहे.

अतिवेगामुळे वर्षनिहाय मृत्यू

२०२३ : ८०
२०२४ : ३५
२०२५ : ६४

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button