
प्रलंबित मागण्यांसाठी आरटीओ कर्मचाऱ्यांचे उद्यापासून बेमुदत आंदोलन; राज्यभरातील कामकाज ठप्प होण्याची शक्यता!
मुंबई :- राज्यातील प्रादेशिक परिवहन कार्यालयातील (आरटीओ) कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी उद्या १६ जूनपासून राज्यव्यापी बेमुदत संपाची हाक दिली आहे. प्रशासनाच्या वेळखाऊ धोरणामुळे आणि आश्वासनांची पूर्तता होत नसल्याने कर्मचारी संघटनेने हा टोकाचा निर्णय घेतला आहे.
आरटीओ विभागाचा आकृतीबंध मंजूर होऊन साडेतीन वर्षांचा कालावधी उलटला आहे, परंतु अद्यापही सेवाप्रवेश नियम तयार करण्यात आलेले नाहीत. या विलंबामुळे कर्मचाऱ्यांना पदोन्नतीपासून वंचित राहावे लागत आहे. यामुळे कर्मचाऱ्यांचे मोठे आर्थिक आणि सामाजिक नुकसान होत असल्याचा आरोप संघटनेने केला आहे.
कर्मचाऱ्यांच्या बहुतांशी मागण्या या प्रशासकीय स्तरावर सुटण्यासारख्या आहेत.मात्र प्रशासन सातत्याने
टोलवाटोलवी करत असल्याने कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र संताप आहे. या पार्श्वभूमीवर शनिवारी कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची तातडीची बैठक पार पडली.या बैठकीत चर्चेच्या अनेक फेऱ्या होऊनही ठोस निर्णय न निघाल्याने, अखेर संपाशिवाय पर्याय नसल्याचा निर्णय घेण्यात आला.
या संपाबाबत भूमिका स्पष्ट करताना कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस सुरेंद्र सरतापे म्हणाले की,आम्ही प्रशासनाला अनेकदा विनंती करूनही आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले जात आहे.सरकार आणि प्रशासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा,अन्यथा जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत आम्ही आंदोलनावरून माघार घेणार नाही.
या संपामुळे १६ जूनपासून राज्यातील आरटीओ कार्यालयांचे कामकाज ठप्प होण्याची शक्यता असून, याचा फटका सामान्य नागरिकांना बसू शकतो. आता प्रशासन यावर काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.




