रत्नागिरी मिरजोळे एमआयडीसीतील दूषित सांडपाण्यामुळे नागरिकांमध्ये संताप; कारवाईची मागणी


रत्नागिरी शहरालगतच्या मिरजोळे एमआयडीसी परिसरातील काही रासायनिक उद्योगांकडून दूषित सांडपाणी वहाळामध्ये सोडण्यात आल्याचा प्रकार रविवारी सकाळी समोर आला. या घटनेमुळे परिसरातील ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

गेल्या काही दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने ओढे-नाले अद्याप पूर्ण क्षमतेने प्रवाहित झालेले नाहीत. अशा परिस्थितीत एमआयडीसीतील काही उद्योगांचे दूषित पाणी जांभूळफाटा ते करंदीकरवाडी परिसरातून वहाळामध्ये मिसळल्याचे स्थानिकांच्या निदर्शनास आले. या पाण्याला तीव्र रासायनिक वास येत असल्याने परिसरात दुर्गंधी पसरली असून, त्याचा परिणाम पिण्याच्या पाण्याच्या विहिरींवर होण्याची भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, यापूर्वीही अनेकदा पावसाच्या पाण्याचा आणि नैसर्गिक प्रवाहांचा आधार घेत रासायनिक सांडपाणी सोडल्याच्या तक्रारी करण्यात आल्या होत्या. मात्र, त्यावर प्रभावी कारवाई झालेली नसल्याने हा प्रकार पुन्हा घडल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. पावसाळ्याच्या तोंडावर पिण्याच्या पाण्याचे स्रोत धोक्यात येत असल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

दरम्यान, ग्रामपंचायतीकडूनही या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष दिले जात असून दूषित पाणी वहाळामध्ये सोडले जाणार नाही यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती सरपंच रत्नदीप पाटील यांनी दिली. तसेच, पंचायत समिती सदस्य वैभव पाटील यांनी ग्रामसभेतही या विषयावर ठराव मंजूर करण्यात आला असून सांडपाण्याच्या व्यवस्थापनासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी प्रशासनाकडे करण्यात आल्याचे सांगितले.

परिसरातील नागरिकांनी दूषित पाणी सोडणाऱ्या उद्योगांची चौकशी करून जबाबदारांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button