
हॅलोजन बल्ब बदलताना विजेचा धक्का; देऊडच्या १९ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
रत्नागिरी तालुक्यातील देऊड येथे घरासमोरील शेडमधील हॅलोजन बल्ब बदलत असताना विजेचा तीव्र धक्का लागून १९ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना मंगळवारी दुपारी घडली. जयराज संजय देसाई असे मृत तरुणाचे नाव असून या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास जयराज घराशेजारील गाडीच्या शेडमध्ये काही काम करत होता. शेडमधील हॅलोजन बल्ब बदलण्याच्या प्रयत्नात असताना विद्युत प्रवाह सुरू असल्याने त्याला अचानक विजेचा तीव्र धक्का बसला. धक्क्याची तीव्रता इतकी मोठी होती की तो जागीच कोसळला.
घटनेनंतर कुटुंबीयांनी आणि स्थानिकांनी तातडीने त्याला जाकादेवी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तपासणीअंती त्याला मृत घोषित केले.
जयराज महाविद्यालयीन शिक्षण घेत होता. शांत, अभ्यासू आणि मनमिळावू स्वभावामुळे तो मित्रपरिवारात आणि गावात सर्वांचा लाडका होता. त्याच्या अकाली निधनाने देसाई कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून गावात शोककळा पसरली आहे.
या घटनेनंतर विद्युत उपकरणांवर काम करताना योग्य खबरदारी घेण्याची गरज पुन्हा अधोरेखित झाली आहे.




