
लाचखोरी प्रकरणातील डॉ. कांचन मदार यांच्या निलंबनाचा प्रस्ताव; आरोग्य विभागाची स्वतंत्र चौकशी सुरू
चिपळूण तालुक्यातील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील कथित लाचखोरी प्रकरणात अटक झालेल्या वैद्यकीय अधिकारी डॉ. कांचन मदार यांच्या निलंबनाचा प्रस्ताव जिल्हा रुग्णालय प्रशासनाने आरोग्य उपसंचालकांकडे पाठविला आहे. वर्ग-दोन ‘अ’ गटातील अधिकारी असल्याने त्यांच्या निलंबनाबाबत अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार आरोग्य उपसंचालकांकडे असल्याचे समजते.
डॉ. मदार यांच्यावर गर्भपातासाठी आवश्यक असलेले किट उपलब्ध करून देण्यासाठी एका गर्भवती महिलेकडून ४ हजार ५०० रुपयांची लाच स्वीकारल्याचा आरोप आहे. या प्रकरणात कारवाई झाल्यानंतर आरोग्य विभागानेही स्वतंत्र विभागीय चौकशी सुरू केली असून संपूर्ण प्रकरणाची सखोल तपासणी केली जात आहे.
दरम्यान, दोन दिवसांची पोलीस कोठडी संपल्यानंतर डॉ. मदार यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला असला तरी त्यांच्यावरील आरोपांचे गांभीर्य लक्षात घेता विभागीय चौकशीची प्रक्रिया सुरूच राहणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
या प्रकरणाच्या अनुषंगाने गर्भपातासाठी वापरण्यात येणाऱ्या औषधांचे व किटचे वितरण करताना वैद्यकीय नियम, प्रक्रिया आणि शासकीय मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्यात आले होते का, याचीही चौकशी केली जात आहे. चौकशी अहवालाच्या आधारे पुढील प्रशासकीय कारवाई केली जाणार असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात येत आहे.
कामथे उपजिल्हा रुग्णालयातील या प्रकरणामुळे आरोग्य विभागात खळबळ उडाली असून, चौकशीच्या निष्कर्षाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.




