
कुर्धे येथे साकवाचा स्लॅब कोसळून तरुण कामगाराचा मृत्यू; बांधकामादरम्यान घडली दुर्घटना
रत्नागिरी तालुक्यातील कुर्धे गावात पऱ्यावर सुरू असलेल्या साकवाच्या कामादरम्यान झालेल्या दुर्दैवी अपघातात २७ वर्षीय कामगाराचा मृत्यू झाला. साकवाचा स्लॅब अचानक कोसळल्याने हा कामगार ढिगाऱ्याखाली अडकला आणि त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली.
पूर्णगड पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आकाश शिवाजी काटे (वय २७, रा. शांतीनगर, रत्नागिरी) हा कुर्धे येथील लिंगायतवाडी आणि खोताचीवाडी दरम्यान पऱ्यावर सुरू असलेल्या पाखाडीच्या कामासाठी गेला होता. सोमवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे पऱ्यावर टाकलेल्या पाखाडीचा काही भाग वाहून गेला होता. त्यामुळे नुकसानग्रस्त भागाची दुरुस्ती आणि साकवाचे काम सुरू होते.
मंगळवारी सकाळी आकाश इतर कामगारांसह पऱ्यात उतरून काम करत असताना अचानक साकवाचा स्लॅब कोसळला. या दुर्घटनेत आकाश ढिगाऱ्याखाली गाडला गेला. पऱ्यात पाणी साचले असल्याने बचावकार्य करताना मोठ्या अडचणी निर्माण झाल्या.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि यंत्रणांनी धाव घेतली. जेसीबीच्या साहाय्याने मलबा हटवून शोधमोहीम राबविण्यात आली. काही वेळानंतर आकाशला बाहेर काढून तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर त्याला मृत घोषित केले.
या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून कामगाराच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या प्रकरणाची नोंद पूर्णगड पोलिस ठाण्यात करण्यात आली असून दुर्घटनेमागील कारणांचा तपास सुरू आहे.




