
६८ वर्षांनंतर ग्रामीण भागाला प्रथमच सभापतीपद
अनंत उर्फ भाऊ मोहिते यांची बौद्धजन सेवा संघाच्या सभापतीपदी बिनविरोध निवड
दापोली |
दापोली तालुक्यातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, आंबेडकरी चळवळीतील खंदे नेतृत्व आणि दापोली नगरपंचायतीचे माजी उपनगराध्यक्ष अनंत उर्फ भाऊ मोहिते यांची बौद्धजन सेवा संघ तालुके दापोली-मंडणगड-मुंबई यांच्या सभापतीपदी बिनविरोध निवड झाली आहे. तसेच शरद जाधव उपासभापतीपदी निवडून आले आहेत. त्यांच्या निवडीमुळे संघटनेच्या तब्बल ६८ वर्षांच्या इतिहासात प्रथमच ग्रामीण भागातील कार्यकर्त्याला सभापतीपदाची संधी मिळाल्याने समाजात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून विविध स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
भाऊ मोहिते हे गेली तीन दशके सामाजिक, शैक्षणिक आणि आंबेडकरी चळवळीतील विविध उपक्रमांमध्ये सक्रियपणे कार्यरत आहेत. समाजातील सर्व घटकांना एकत्र घेऊन काम करण्याची त्यांची कार्यशैली आणि संघटन कौशल्य यामुळे त्यांना समाजात विशेष मानाचे स्थान प्राप्त झाले आहे. त्यांच्या निवडीकडे केवळ एका पदाची निवड म्हणून नव्हे, तर ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांच्या योगदानाचा सन्मान म्हणून पाहिले जात आहे.
भाऊ मोहिते यांनी यापूर्वी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती समितीचे अध्यक्ष तसेच मध्यवर्ती कमिटीचे अध्यक्ष म्हणूनही यशस्वी कामकाज सांभाळले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आलेले आंबेडकर जयंती महोत्सव हे शिस्तबद्ध नियोजन, भव्य स्वरूप आणि जनसहभागासाठी विशेष ओळखले जात होते. त्यांच्या कार्यकाळात जयंती उत्सव मोठ्या उत्साहात आणि दणक्यात साजरा करण्यात येत असल्याने समाजबांधवांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले होते.
निवडीनंतर बोलताना भाऊ मोहिते यांनी सांगितले की, “समाजात काही प्रमाणात आलेली मरगळ दूर करून नव्या पिढीला सामाजिक कार्याशी जोडण्याचा माझा प्रयत्न असेल. समाज अधिक प्रगल्भ, संघटित आणि सक्षम व्हावा यासाठी सर्वांना सोबत घेऊन काम केले जाईल. राजकारण विरहित काम करून सर्व गट-तटांमध्ये समन्वय निर्माण करून समाजाची पुनर्बांधणी करण्याला प्राधान्य दिले जाईल.”
बौद्धजन सेवा संघाच्या कार्यपद्धतीनुसार संघटनेच्या ८३ ग्रामीण शाखा आणि ४९ मुंबई शाखा कार्यरत आहेत. या शाखांमधून निवडलेल्या प्रतिनिधींमार्फत दोन कौन्सिलर नियुक्त केले जातात. त्यानंतर अध्यक्ष आणि सभापती यांची निवड केली जाते. मात्र यावेळी भाऊ मोहिते यांच्या कार्याचा गौरव म्हणून त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली, हे विशेष उल्लेखनीय मानले जात आहे.
त्यांच्या निवडीमुळे दापोली, मंडणगड तसेच मुंबईस्थित समाजबांधवांमध्ये उत्साहाचे वातावरण असून अनेक सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि आंबेडकरी संघटनांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांना नेतृत्वाच्या मुख्य प्रवाहात स्थान मिळवून देणारी ही निवड भविष्यातील सामाजिक परिवर्तनासाठी महत्त्वाची ठरेल, असा विश्वास समाजबांधव व्यक्त करत आहेत.
भाऊ मोहिते यांच्या नेतृत्वाखाली बौद्धजन सेवा संघाला नवी दिशा मिळेल, समाजातील विविध घटकांमध्ये ऐक्य वाढेल आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रसार अधिक प्रभावीपणे होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. त्यांच्या बिनविरोध निवडीने दापोली-मंडणगड परिसरातील आंबेडकरी चळवळीला नवे बळ मिळाल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत आहे.




