
आरोग्य मंदिर (रत्नागिरी) येथे एसटी बस- रुग्णवाहिकेची धडक
रत्नागिरी शहरातील आरोग्य मंदिर परिसरात आज (६ जून) सायंकाळच्या सुमारास एसटी बस आणि रुग्णवाहिकेचा अपघात झाला. रुग्णवाहिका रिकामी असल्याने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही; मात्र दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. या अपघातामुळे दोन तास वाहतुकीचा खोळंबा झाला होता.
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी सायंकाळी ४:३० वाजण्याच्या सुमारास एसटी स्टँडवरून गणपतीपुळेच्या दिशेने जाणारी एसटी बस आरोग्य मंदिर परिसरातून जात होती. त्याच वेळी रुग्ण घेण्यासाठी उद्यम नगर येथील रुग्णालयाकडे निघालेल्या रुग्णवाहिकेची या एसटी बससोबत जोरदार धडक झाली. रुग्णवाहिका रुग्णाला आणण्यासाठी जात असल्याने ती रिकामी होती. सुदैवाने, या अपघातात कोणीही जखमी झाले नाही, मात्र अपघाताची तीव्रता इतकी होती की, एसटी बसची दर्शनी काच फुटली, तर रुग्णवाहिकेचा टायरही फुटला.
अपघातानंतर आरोग्य मंदिर परिसरात काही काळ वाहतुकीचा खोळंबा झाला होता.




