
किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा..आरोग्य विभागाची विशेष तयारी.!
- किल्ले रायगड येथे ५ व ६ जून रोजी होणाऱ्या श्री शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी रायगड जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग पूर्णपणे सज्ज झाला आहे. सोहळ्यानिमित्त हजारो शिवभक्त रायगडावर दाखल होणार असल्याने त्यांच्या आरोग्याची विशेष काळजी घेण्यासाठी गडावर व पायथ्याशी १३ विशेष वैद्यकीय पथके, २४ तास कार्यरत रुग्णवाहिका तसेच मुबलक औषधसाठा उपलब्ध करून देण्यात आला आहे.
सध्या जिल्ह्यात उन्हाचा तीव्र तडाखा जाणवत असून उष्माघात, चक्कर येणे, अशक्तपणा, थकवा तसेच गर्दीमुळे होणाऱ्या किरकोळ दुखापतींचा धोका लक्षात घेऊन आरोग्य विभागाने व्यापक नियोजन केले आहे. शिवभक्तांना तातडीची वैद्यकीय मदत मिळावी यासाठी रायगड किल्ल्यावरील विविध ठिकाणी आणि पाचाड येथील राजमाता जिजाऊ समाधी परिसरात तात्पुरती वैद्यकीय मदत केंद्रे उभारण्यात येणार आहेत. प्रत्येक पथकात एक वैद्यकीय अधिकारी, एक समुदाय आरोग्य अधिकारी आणि एक आरोग्यसेवक असणार आहे.
सोहळ्यादरम्यान कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास त्वरित उपचार मिळावेत यासाठी डॉक्टर, परिचारिका आणि पॅरामेडिकल कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच गडाच्या पायथ्याशी आणि परिसरातील प्रमुख मार्गांवर २४ तास रुग्णवाहिका सेवा उपलब्ध ठेवण्यात आली आहे. सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये जीवनरक्षक औषधे, आवश्यक लसी आणि इतर वैद्यकीय साहित्याचा पुरेसा साठाही ठेवण्यात आला आहे.
शिवभक्तांना उन्हाचा त्रास होऊ नये यासाठी प्रत्येक वैद्यकीय केंद्रावर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली असून आरोग्य विभागाचे कर्मचारी सतत दक्ष राहणार आहेत. जिल्हा परिषद प्रशासनाने शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी येणाऱ्या प्रत्येक शिवभक्ताच्या आरोग्याची काळजी घेण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
कुठे असतील वैद्यकीय पथके?
ही पथके कोंझर पार्किंग १ व २, वाय जंक्शन, चित्त दरवाजा, चित्त दरवाजा-महादरवाजा मार्ग, महादरवाजा, वाळसुरे पार्किंग, पाचाड धर्मशाळा, नाणे दरवाजा, शिवसृष्टी पार्किंग (पाचाड गाव), कवळीचा माळ, मदारी मेहतर ते महादरवाजा मार्ग, प्राथमिक आरोग्य केंद्र पाचाड ओपीडी तसेच राखीव पथक अशा विविध ठिकाणी कार्यरत राहणार आहेत. यामुळे सोहळ्यादरम्यान कोणत्याही ठिकाणी वैद्यकीय मदतीची आवश्यकता भासल्यास तात्काळ सेवा उपलब्ध होणार आहे.




