
शालेय बस प्रवास महागला; जूनपासून १५ टक्के शुल्कवाढ लागू
मुंबई : नव्या शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभीच विद्यार्थ्यांच्या पालकांवर आर्थिक भार वाढणार आहे. स्कूल बस ओनर्स असोसिएशन ऑफ महाराष्ट्र (SBOA)ने शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी शालेय बस वाहतूक शुल्कात १५ टक्के वाढ करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. ही वाढ जून २०२६ पासून लागू होणार आहे.
संघटनेच्या निवेदनानुसार, वाढत्या खर्चामुळे शुल्कवाढ अपरिहार्य बनली आहे. केवळ डिझेलच्या किमतीत झालेली वाढच नव्हे, तर चालक व कर्मचाऱ्यांचे वेतन, वाहनांची देखभाल-दुरुस्ती, टोल शुल्क, परवाने, कायदेशीर अनुपालन खर्च, ई-चालान आणि विविध दंड तसेच महागाईमुळे वाढलेले परिचालन खर्च यामुळे शालेय बस सेवा चालवणे अधिक खर्चिक झाले आहे.
शालेय वाहतूक व्यवसायासमोरील अडचणींबाबत राज्य सरकार आणि परिवहन विभागाकडे वारंवार पाठपुरावा करण्यात आला होता. शुल्कवाढ टाळण्यासाठी विविध पर्यायही सुचविण्यात आले होते. मात्र, यासंदर्भात कोणताही ठोस निर्णय न झाल्याने अखेर शुल्कवाढीचा निर्णय घ्यावा लागल्याचे संघटनेने स्पष्ट केले.
पालक, शाळा आणि संबंधित सर्व घटकांनी सहकार्य करावे, तसेच राज्य सरकारने परिस्थितीचा गांभीर्याने विचार करून विद्यार्थी, पालक, शाळा आणि शालेय वाहतूक व्यवसायाच्या हिताचे निर्णय घ्यावेत, असे आवाहन स्कूल बस ओनर्स असोसिएशन ऑफ महाराष्ट्रचे अध्यक्ष अनिल गर्ग यांनी केले आहे.




